रे टॉम्लीनसन—ईमेलचा शोधक

         संगणकाने मानवाचं आयुष्य, त्याचा जीवनक्रम बदलून टाकला आहे. यात संशय नाही. त्यातच जगातले स्वतंत्र व वेगवेगळे संगणक आंतरमहाजालाच्या सहाय्याने एकमेकांना जोडून टाकण्याची सोय झाल्यानंतर तर मोठीच क्रांती झाली आहे. एरव्ही दूरदूरच्या ठिकाणी-परदेशात पत्र पाठविण्याचा खर्च, पत्र मिळण्यास होणारा उशीर, पत्र गहाळ होणे, अशा समस्यांवर उपाय म्हणून आंतरमहाजालाच्या माध्यमातून ई-पत्र किंवा ई-मेल पाठविणे हा प्रकार खूपच लोकप्रिय ठरत आहे. ई-मेल या माध्यमाचा जनक आहे तो रे टॉम्लिन्सन हा खटपट्या माणूस. आता आपण माहिती घेऊ या. त्याच्या उचापतीची.

         आज आपण आपल्या दैनंदिन जीवनात सहजपणे वापरत असलेल्या अनेक सुविधा-शोध हे लष्करी संशोधनातून निर्माण झालेले आहेत. आज माहितीच्या विस्फोटात क्रांतिकारी भूमिका बजावत असलेले इंटरनेट किंवा आंतरमहाजालही त्याला अपवाद नाही. युद्धजन्य परिस्थिती किंवा अगदी आण्विक युद्धातही लष्करी तळ व लष्करी मुख्यालयातलं संदेश व माहितीचं आदानप्रदान सुरळीत राहावं म्हणून ते एकमेकांना संगणक व केबल्सच्या साहाय्याने जोडून टाकण्याच्या दृष्टीने संशोधन हाती घेण्यात आलं. हे काम अॅडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी म्हणजे आर्पा या संस्थेकडे देण्यात आलं होतं. या प्रकल्पातील संशोधकांमध्येच रे टॉम्लिन्सनही होता. या प्रकल्पातून सुरुवातीला र्पानेट या संदेशवाहक जाळ्याचा उदय झाला. एकमेकांपासून दूर अंतरावर असलेली कॅलिफोर्निया व स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूट ही विद्यापीठ र्पानेटद्वारे जोडून १९६९ च्या सप्टेंबर महिन्यात पहिल्यांदा या विद्यापीठातील संगणकावर असलेल्या माहितीचं आदानप्रदान करण्यात आलं.

          अर्थात हा लष्करी प्रकल्प असल्यामुळे तसेच चांद्रविजयाच्या लाटेमुळे त्याचा फारसा गाजावाजा झाला नाही. अर्पानेटने कॅलिफोर्नियाबरोबरच साऊथ कॅरोलिना व उटाह या राज्यांना तसेच १९७१ पर्यंत इतर २० राज्यांना आपल्या कवेत घेतले. ते आणखी वेगाने फोफाऊ लागल्यावर त्याचं अर्पानेट हे नाव मागे पडून इंटरनेट हे नाव लोकप्रिय झालं. तोपर्यंत हा प्रकल्प पेन्टागॉन या अमेरिकी संरक्षण संस्थेच्या अपेक्षित मर्यादेपेक्षा  जास्त प्रमाणात विस्तारला होता. त्यामुळे एरवी कामाच्या रगाड्यात हरविलेल्या टॉम्लिन्सनला बराच मोकळा वेळ मिळू लागला व तो आपल्याला सतावत असलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी प्रयत्न करु लागला. केबलने जोडलेल्या दोन संगणकांमध्ये माहितीचं आदान प्रदान शक्य असलं तरी जाळ्यातील आपल्याला हव्या असलेल्या पाहिजे त्या संगणकाकडे आपल्याला हवा तो संदेश पाठविणं शक्य आहे का? हा टॉम्लिनसनला सतावणारा मुख्य प्रश्न. थोडक्यात संगणकाचं हे आंतरमहाजाल टपाल खात्यासारखं वापरता येईल का?

         १९७१ व त्याअगोदर संगणकाद्वारे संदेश मिळविण्यासाठी वेगळी व्यवस्था होती. ते संदेश मिळविण्यासाठी SNDMSG ही संगणक आज्ञावली वापरली जात होती. यात एक संगणक वापरणारा दुसऱ्यासाठी सूचना लिहून ठेवत असे व नंतर तो दुसरा माणूस तो संगणक वापरावयास आल्यानंतर त्याच्या नावाचा साठविलेला संदेश उघडून वाचत असे. अर्थातच ही प्रक्रिया एकाच संगणकावर चालत असे. ही याची मोठीच मर्यादा होती.

         ही मर्यादाच टॉम्लिन्सनला खटकत होती. आर्पानेटसाठी ऑपरेटिंग सिस्टम बनविण्यासाठीकाम करणारा टॉम्लिन्सन मग कामाला लागला. आधीच्या SNDMSG या आज्ञावलीत संदेश साठविणे व सूचना मिळताच ते उघडणे, ही एवढीच गोष्ट होती. तरीही त्या आज्ञावलीचा उपयोग करण्याचं टॉम्लिन्सनने ठरविलं. तर एका संगणकापासून दुसऱ्या संगणकापर्यंत संदेश पोहचविण्यासाठी CPYNET ही आज्ञावली वापरण्याचं त्याने ठरविलं. थोडक्यात SNDMSG आणि CPYNET या दोन्ही आज्ञावल्यांचं बेमालूम मिश्रण केलं. त्यासाठी त्यात जरुर ते बदल केले. अर्थात आपण केवढ्या मोठ्या क्रांतीची कवाडं उघडी करत आहोत, याची जाणीव टॉम्लिन्सनला नव्हतीच.

         टॉम्लिन्सनने आपले प्रयोग सुरु केले तेव्हा आर्पानेटने जोडलेल्या संगणकांची संख्या कमी असली तरी ते वेगवेगळ्या ठिकाणी होते. त्यांचे पत्ते व तो प्रत्येक संगणक वापरणाऱ्या माणसांची नावंही वेगवेगळी होती. त्यामुळे संगणकाच्या स्थानाबरोबरच त्या अपेक्षित व्यक्तीचे नावही संदेश पाठविताना बरोबर असणे गरजेचे होते. त्याचबरोबर ही नावं व स्थानं एकमेकांत मिसळून घोटाळा होणार नाही, हे पाहणंही जरुरीचं होतं. त्यासाठी टॉम्लिनसनने व्यक्तीचं नाव व स्थान संक्षिप्त करून त्यात इंग्रजीत at the rate of साठी वापरली जाणारी @ ही संज्ञा मध्ये टाकून दिली. ही युक्ती त्याला अनपेक्षितपणे सुचली होती. आज हीच संज्ञा ई मेल चं प्रतीक म्हणून लोकप्रिय ठरली आहे. ही संज्ञा मुळाक्षर म्हणून इंग्रजीत कधीही वापरली जात नसल्याने संगणकाला स्थान व व्यक्तीचे नाव यात फरक ठरविण्यात कोणतीही अडचण पडत नाही हेच तिचे वैशिष्ट्य.

          ही सगळी जुळवाजुळव झाल्यानंतर टॉम्लिनसनने आपल्या कार्यालयातल्या खोलीत असलेल्या KSR-33 या मॉडेलच्या संगणकावरून अर्पानेटने जोडलेल्या कार्यालयाच्या दुसऱ्या खोलीत असलेल्या दुसऱ्या KSR-33 संगणकाकडे संदेश पाठविला. हेच ते जगातलं पहिलं ई मेल किंवा ई पत्र . दोन्ही संगणकामधलं अंतर कमी असलं तरी ते दोन्ही संगणक अर्पानेटद्वारे जोडलेले असल्यामुळे हा संदेश अर्पानेटच्या जाळ्यामधून फिरून योग्य ठिकाणी पोहोचला होता. संदेश पाठविल्यानंतर टॉम्लिन्सनने त्या खोलीत जाऊन हा संदेश उघडला. दुर्दैवाने टॉम्लिन्सनला आपण कोणता संदेश पाठविला होता आणि तो दिवस व महिना कोणता होता हे जराही आठवत नाही. फक्त ते वर्ष १९७१ चं असल्याचं त्यांना आठवतं. ते काहीही असलं तरी रे टॉम्लिन्सनच्या या शोधाने जग जवळ आणलं आहे यात शंका नाही.

           :- पंकज कालुवाला


No comments