बासरीचा जन्म 35,000 वर्षांपूर्वीच !

 

                बासरी किंवा पावा असे शब्द कानावर पडले की मुरलीधर कृष्णाची अन् त्याच्या बासरीच्या सुरावटीवर धुंद होऊन नाचणाऱ्या गोपिकांची मनमोहक अदा डोळ्यासमोर येते अन आपले पायही नकळतपणे त्या सुरावटीवर ताल धरू लागतात. भारतीय संस्कृतीत राधेश्याम कन्हैयाचं नातं बासरीशी घट्ट असल्याचं दाखविलं असलं तरी आधुनिक विज्ञानाने मात्र बासरी अन आदिमानवाचं नातं जुनं व जास्त जवळचं असल्याचं दाखवून दिलं आहे. कसं ते समजावून घ्यायचंय. मग चला जर्मनीतल्या अॅश व्हॅली येथे. तेथे झालेल्या उत्खननात ३५,००० वर्षापूर्वी आदिमानवांनी तयार केलेली बासरी सापडली आहे. ही बासरी हाडापासून बनविली आहे, हे येथे नोंदवायला हवे.

                जर्मनीतल्या अॅश व्हॅलीतल्या ह्या उत्खननात मिळालेली ही बासरी प्रचंड आकाराच्या गिधाडाच्या पंखातील हाडापासून बनविलेली असल्याचं वैज्ञानिकांनी म्हटलंय. ही बासरी २२ सेंटीमीटर लांब असून तिचा व्यास २.२ सेंटीमीटर आहे. तसेच तिच्यावर चार छिद्रं आहेत. येथल्या उत्खननातून वेगवेगळ्या प्रकारच्या १२ बासऱ्या वैज्ञानिकांना मिळाल्या आहेत. त्यात हस्तिदंतापासून बनविलेल्या बासऱ्यांचाही समावेश आहे. ह्या बासऱ्यांबरोबरच वैज्ञानिकांना जळालेली हाडे, मांस, अस्थिपंजर, चरबीचे अवशेष तसेच काही गुहांच्या भिंतीवर प्राण्यांच्या रक्ताचा तसेच चरबीचा उपयोग करून चित्रकाम केल्याचंही दिसून आलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी करणारे गुहातून वास्तव्य करणारे ओरिग्नेशिअन प्रकारचे आदिवासी येथे चाळीस हजार वर्षापूर्वी रहात होते. ह्या आदिवासींची वस्ती येथे दहा हजार वर्षापूर्वीपर्यंत होती असं म्हणतात.

             अशा अतिशय व प्राथमिक आदिमानवांच्या काळातली ही बासरी सापडणं म्हणजे एक आश्चर्यच मानलं पाहिजे. त्यावरूनच हा आदिमानव सुरावटींचा आस्वाद घेत असावा असा तर्क करायला जागा आहे. अर्थात आताच्या संगीताशी तुलना करता हे संगीत चित्रविचित्र आवाजांचा गोधळ असावा हेही तितकेच खरे. ते काहीही असलं तरी ह्या आदिमानवाला बासरी तयार करायची कल्पना सुचली तरी कशी? वैज्ञानिक त्याचं स्पष्टीकरण असं देतात, की हाडातून मांस चोखून घेण्याच्या प्रक्रियेत आवाज होतो, हे त्यांच्या लक्षात आले असावे. पुढे पुढे चोखून घेण्याच्याच नव्हे तर हाडांमधील पोकळ जागांमधून कुंकर मारल्यासही आवाज निर्माण होतो, हे त्याला समजले. अशा प्रकारे आवाज निर्माण होण्याची ही प्रक्रिया त्यांना चमत्कारासारखी वाटून त्याने ते प्रभावित नक्कीच झाले असणार. त्यातून मग पुढे त्याच्या प्रयोगांना सुरुवात झाली असणे सहज शक्य आहे. ह्या प्रयोगातूनच मग बासरीपर्यंतची वाटचाल झाली असं मानता येईल. सुरावटीत बदल करण्यासाठी काही अंतरावर निरनिराळी छिद्रे ठेवून बासरी करेपर्यंतची ही वाटचाल झाली हे समजण्यासारखं आहे.

                         ह्या बासऱ्यातील हस्तीदंतापासून बनविलेल्या बासऱ्यांचं वैज्ञानिकांना विशेष कुतूहल आहे. पोकळ हाडापासून बासरी तयार करणं एकवेळ सोपे असले, तरी हस्तीदंतापासून बासरी सोपी नाही. अर्थात ह्या हस्तीदंती बासरीचा काही भागच वैज्ञानिकांना सापडला आहे. ही बासरी कशा प्रकारे बनविली आहे, ह्याचा जास्त अभ्यास करताना वैज्ञानिकांना दिसून आलं की ही बासरी दोन भागात बनवून नंतर जोडण्यात आली आहे. हे जोडकाम करण्यासाठी एखादा चांगला चिकट पदार्थ वापरण्यात आल्याचंही वैज्ञानिकांनी नोंदवलंय.

                                                                                                                                                                                                                                         :- पंकज कालुवाला


No comments