कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी श्री.मानसिंग पाटील साहेब !

 हेरगिरी,राजकारण-आंतरराष्ट्रीय राजकारण ,गुन्हेगारी अशा विषयांवर का लिहिता, असे प्रश्न आम्हाला नेहमी विचारले जात असतात. त्याचं उत्तर अगदी थोडक्यात द्यायचं तर पोलीस यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा, आपली तिन्ही सैन्य दलं ही या देशाची मुख्य आधारस्तंभ आहेत आणि ही जाणीव जनमानसात खोल रूजावी, त्यांच्या कामाची, कार्यपद्धतीची ओळख सर्वसामान्यांना व्हावी, या यंत्रणांविषयी आदरभाव वाढावा हा उद्देश लेखनामागे असतो. आदरभाव वाढवणं हा मुख्यं उद्देश असला तरी काही वेळेला जेथे त्रुटी दिसतील,दोष दिसतील तेथे कटु लिहावं-नोंदवावं लागतं. कटू-कठोर लिहिल्याने काही माणसं दुखावली जातात हे खरं असलं तरी लिखाणामुळेच अनेक माणसं जोडलीही गेली आहेत हे नोंदवणं महत्वाचं वाटतं. सर्वसाधारणपणे प्रामाणिकपणे केलं गेलेलं लिखाण हे प्रामाणिक माणसांनाच आवडतं असा माझा अनुभव आहे. पुस्तकांमुळेच जोडल्या गेलेल्या आमच्या मित्रांपैकीच एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे पोलीस मित्र पोलीस निरिक्षक श्री. मानसिंग पाटील साहेब.

मूळचे कोल्हापूरचे असलेल्या पण बराच काळ आमच्या पालघर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या श्री. पाटील साहेबांना आणि त्यांच्या सहकार्‍यांना भेटण्याचा योग अंमळ उशीरानेच जुळून आला हे तसं आमचं थोडं दुर्दैवच म्हणावं लागेल. कामाच्या स्वरूपामुळे असं होतं आणि त्याला काही इलाज नाही. श्री.पाटील सध्या केळवे सागरी पोलीस ठाण्याचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असले तरी आधी आमच्याच परिसरातल्या सफाळे पोलीस ठाण्याचे मुख्याधिकारी, पालघर दहशतवाद विरोधी पथकाचे प्रभारी म्हणूनही कार्यरत होते. प्रामाणिक,कर्तव्यदक्ष आणि महत्वाचं म्हणजे कोणत्याही राजकीय व धनदांडग्यांच्या दबावाला न जुमानणारे पोलीस अधिकारी म्हणून जनमानसात त्यांची प्रतिमा रूजलेली आहे. अशा प्रकारे सर्वसामान्यांचा विश्वास जिंकणं हे वाटतं तितकं  सोपं काम नाही.

करोनाकाळाच्या सुरूवातीला पालघरला झालेल्या साधूंच्या हत्याकांडाच्या त्यांनी केलेल्या तपासकामाचं पोलीस दलातून चांगलच कौतुक झालं.

त्याहीआधी सफाळे पोलीस ठाण्यात कार्यरत असताना श्री. पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी डिझलचोरांच्या टोळीला पाठलाग करून जेरबंद करण्याचा पराक्रम केला होता. ते करताना गोळीबार झेलण्याचा आणि प्रत्युत्तरादाखल गोळीबार करण्याचा धोकाही त्यांनी स्वीकारला होता हे येथे ठळकपणे नोंदवायला हवं. डिझलचोरांचं ते एक मोठंच विचित्र प्रकरण होतं यात शंका नाही. विचित्र कशासाठी ?.... तर सफाळे पोलीस ठाणे वर्षानुवर्षे ज्या इमारतीत आहे ती इमारतच या डिझलचोराच्या कुटुंबाच्या मालकीची आहे. ते कुटुंबही कोट्याधीश आहे. अशा वेळी अशा प्रकारची कारवाई करताना बाहेरून आणि आतूनही कोणत्या दबावाला तोंड द्यावं लागलं असेल याची कल्पनाही करवत नाही. कर्तव्यनिष्ठा आणि धाडस असल्याशिवाय हे करता येणं अशक्य असतं.

गुन्हेगारी रोखणं आणि त्याही पुढे जाऊन गुन्हेगारी संपवणं हे पोलीस खात्याचं कर्तव्य आहे हे खरंच आहे. त्यासाठी पोलिसांना बर्‍याचदा दंडुक्याचा व  प्रसंगी पिस्तुलाचा वापर करावा लागतो आणि तो त्यांनी केलाही पाहिजे यात वाद नाही. पण प्रत्येक वेळी दंडुका आणि पिस्तुल वापरलच पाहिजे असं नाही याचंही भान पोलीस अधिकार्‍यांना असावं लागतं. तसं उत्तम भान आमच्या श्री.मानसिंग पाटील साहेबांना आहे हे नमूद करताना विशेष आनंद होतो. प्रत्येक माणूस गुन्हेगारी प्रवृत्तीचा असतोच असं नाही. काही वेळा अनवधानाने, कधी कायद्यांची जाण नसल्याने, अनेकदा तारूण्यात उसळतं-खवळतं रक्तं असल्याने छोटेमोठे गुन्हे- गुन्हे म्हणण्यापेक्षा आपण चूका म्हणू-चूका या घडत असतात. अशा वेळी त्यांना निर्ढावलेल्या गुन्हेगारांसारखं वागवण्यात काही अर्थ नसतो. योग्य शब्दात जरब दिली, त्यांना विधायक कामात गुंतवण्याची शिक्षा केली, त्यांच्यावर पुरेसं लक्ष ठेवण्याची दक्षता घेतली की, गुन्हेगार तयार होण्याच्या प्रक्रियेला लगाम घालता येऊ शकतो. हे कामही उत्तम होतयं. निर्ढावलेल्या गुन्हेगारांना संपवलंच पाहिजे हे मात्र खरंच आहे.

पोलीस यंत्रणा असो,गुप्तचर यंत्रणा असो, सैन्य दलं असो वा जीवनातलं कोणतंही क्षेत्र असो तेथे संघभावनेला आणि नेतृत्वावरिल विश्वासाला फार महत्व असतं. ते वरिष्ठ अधिकारी आपल्या कनिष्ठ सहकार्‍यांना कसं वागवतात, मार्गदर्शन करातात,प्रोत्साहीत करतात, किती विश्वास टाकतात यावर ठरतं. वरिष्ठांची छाप ही त्यांच्या कनिष्ठ सहकार्‍यांच्या देहबोलीत, बोलण्यात आणि नजरेतही पडलेली दिसते. त्यातून तयार झालेली सकारात्मकता कशी असते याचा अनुभव केळवे पोलीस ठाण्याला भेट देऊन मी स्वत:च घेतला आहे. ही सकारात्मकता पुढेही अशीच कायम र्‍हावो हीच सदिच्छा ! स्वत: वाचन करण्याबरोबरच आपल्या सहकार्‍यांनाही वाचन करण्यास प्रोत्साहीत करणं हाही याच सकारात्मकतेचाच एक भाग. तोही येथे अनुभवला.




शेवटी जाता जाता पुस्तकप्रेमामुळे काय होतं हे येथे नोंदवायला हरकत नाही. प्रबोधन वगैरे मोठे मोठे शब्द मी काही वापरत नाही. तसा काही दावाही नाही. महत्वाचं काय असेल तर ते आहे माणसांशी माणसं जोडणं आणि ते काम चांगल्या प्रकारे होतंय. पुस्तकांमुळेच श्री.पाटील साहेबांशी आणि त्यांच्या सहकार्‍यांशी ओळख झाली, मैत्री झाली. साहेबांच्या सहकार्‍यांच्या नावांची यादी भलीमोठी होईल म्हणून येथे देत नाही. पण ही सगळी मंडळी आमच्या घरी आली माझ्या कुटंबियांना - माझी आई, मामा,काका, माझे भाऊ, वहिनी,बहिणी, पुतणे आणि मित्रपरिवाराला अगदी आपुलकीने भेटली. तसंही आमचं कुटुंबं मोठं आहेच पण श्री. मानसिंग पाटील साहेब आणि सहकार्‍यांमुळे ते आणखी विस्तारलं याचा मनस्वी आनंद होतोय.

तसं आपलं महाराष्ट्र राज्य आणि एकूणच आपला भारत देश हे एक मोठं महाकाय कुटुंबं आहे आणि या अवाढाव्य कुटुंबाच्या रक्षणाची मोठी जबाबदारी ही पोलीस दलावर आहे. म्हणूनच श्री. मानसिंग पाटील साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांना सुयश चिंतितो आणि उत्तमोत्तम कार्य त्यांच्या हातून पार पडो,उत्तम आरोग्य लाभो म्हणून सदिच्छा व्यक्त करतो.

17 comments:

  1. अप्रतिम....💐💐💐🙏

    ReplyDelete
  2. श्री मानसिंह पाटील साहेब यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

    ReplyDelete
  3. मानसिंह पाटील साहेब जिंदाबाद

    ReplyDelete
  4. एक महान और इमानदार अफसर

    ReplyDelete
  5. Mansingh Patil Sir is a Brave and Honest Police Officer.

    ReplyDelete
  6. अभिनंदन भाऊसाहेब💖💖💖

    ReplyDelete
  7. खूप छान दादा एक नंबर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दादा

    ReplyDelete
  8. भाऊ खुप छान. आपल्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा. आपल्या कामगिरीचा आलेख असाच चढता राहो.

    ReplyDelete
  9. अभिनंदन भाऊसाहेब
    खूप खूप छान

    ReplyDelete
  10. जोहार
    खुप छान,पोलीस असावे त मानशिंग पाटील सरान सारखे,त्यांचे काम है पारदर्शी आहे,त्यांना पुस्तक वाचण्याची आवड आहे, आणि कुठली हि गोष्ट असेल त्या गोष्टीला ते सोप्या भाषेत समजवून सांगतात,नेहमी सामाजिक कामा साठी पुढे असतात, मेहनती, हुशार, स्वाभिमानी, मददगार, मानशिंग पाटील सरांना मनाच्या जोहार✊️ 😊

    ReplyDelete
    Replies
    1. माझाही मानाचा जोहार.🙏

      Delete
  11. पुढील यशस्वी वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा साहेब 👍

    ReplyDelete
  12. *अरे बापरे...माझ्या सारख्या एका सर्वसामान्य पोलीस अधिका-या चे पंकज सरांनी खूपच कौतुक केले आहे. खरेतर त्यांच्या सारखे देशभक्ती असलेले व देशहित समोर ठेवून एका आगळ्या वेगळ्या परंतु तितक्याच गुंतागुंतीच्या विषयाला हात घालून जागतिक पातळीवर ज्याची कारणमीमांसा केली जाते अशा रीतीने लेखन करून मोठ्या ताकतीने एक लेखक म्हणून स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहेच शिवाय एक उत्कृष्ट समीक्षक म्हणून सुद्धा ते समाजातील आंतररष्ट्रीय स्तरावरील घडामोडींकडे लक्ष ठेवून त्यांची सूक्ष्म निरीक्षणे नोंदवत असतात ही..विलक्षण बाब फक्त त्यांचे सारखे विभुतीच करू शकतात. खरेतर त्यांचे लेखन कार्यास त्रिवार वंदन...💐💐💐🙏🙏🙏*

    ReplyDelete
  13. सर्वांचे मनःपूर्वक आभार...🙏🙏🙏

    ReplyDelete