अदृश्य जहाजं येताहेत

          ऱ्याच्या, जादुगारांच्या राज्यांतून फिरताना त्यांच्या गायब होण्याच्या, अदृश्य होण्याच्या करामती आपल्याला ऐकायला, वाचायला मिळत असतात. आपल्यालाही त्या करामती कराव्याशा वाटतात; पण तसं ते काही शक्य नसतं. कल्पनेच्या राज्यांतून विहरताना मनोरंजनापुरतं ते शक्य असलं तरी प्रत्यक्षात तसं करणं आजपर्यंत तरी कुणाला जमलेलं नाही; पणअशा गायब होण्याचे किंवा नजरेतून तात्पुरतं दिसेनासे होण्यामागचे फायदे लक्षात घेऊन शास्त्रज्ञ या कल्पनेचा पाठपुरावा करण्याच्या मागे लागले आहेत. अर्थात परिकथेप्रमाणे अदृश्य होणं शक्य नसलं तरी बऱ्याच अंशी आपण अशी किमया साध्य करू शकतो, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. त्यांच्या याच विश्वासातूनच मानवी डोळ्यांनाही न दिसू शकणारी अदृश्य लढाऊ जहाजं येऊ घातली आहेत.

 

           अशा प्रकारच्या करामती करणं शक्य होतं ते स्टेल्थ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने. या नवीन प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनविण्यात येणारी नवी लढाऊ जहाजं ही फिरत्या रडारना भुलविण्यास,उष्णतेचा मागोवा घेत थडकणाऱ्या प्रक्षेपणास्त्रांना फसविण्यास, आपल्या स्वत:च्या कंपनातून निर्माण होणारा आवाज बदलण्यास सक्षम असतील. त्याचबरोबर प्रचंड आकाराचं जहाज जेव्हा एका ठिकाणाहून दुसरीकडे जातं तेव्हा त्याचा परिणाम त्या ठिकाणाच्या पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर होतो. म्हणजेच एका प्रकारे जहाजाने आपला चुंबकीय माग तेथे सोडलेला असतो. नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनविलेली जहाजं अशा प्रकारचा माग कमीत कमी सोडतील.

 

            तसं पाहिलं तर शत्रूला फसविण्यासाठीच्या युक्त्या मानव युद्धात नेहमीच वापरत आला आहे. पण त्याला विज्ञान-तंत्रज्ञानाची जोड देऊन ते प्रगत बनविलं गेलं ते मात्र विसाव्या शतकात लढल्या गेलेल्या युद्धातून. शत्रूला जहाज दिसू नये यासाठी आधीच्या काळात केला गेलेला महत्त्वाचा प्रयोग म्हणजे जहाजाला ज्वालांच्या आकारासारखा चट्ट्या चट्ट्यांचा रंग फासण्याचा प्रयोग. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन लष्कराने प्रकाशाच्या साहाय्याने जहाजाचा व जहाजाच्या आजुबाजूला असलेल्या समुद्राचा रंग एकसमान करण्याचा प्रयोग केला होता. विशिष्ट प्रकारचा रंग आणि फोमचं आवरण जहाजावर घालून रेडिओलहरींना शोषून घेऊन त्याचं रूपांतर उष्णतेत करून त्यांचं परावर्तन रोखून रडारवर जहाजाचा माग लागू न देण्याचेही प्रयोग झाले आहेत.

 

            शत्रूला आपल्या मागे कमीत कमी लागू देणारं जहाज सध्या तरी स्वीडनपाशी आहे. त्याचं नाव आहे व्हिस्वी कॉरव्हेट. या जहाजाला करड्या रंगाचा रंग फासला असून, रेडिओ लहरींचं कमीत कमीत कमी परावर्तन करणाऱ्या पदार्थांचा वापर जहाज बनविताना करण्यात आला आहे. त्याप्रमाणे जहाज पुढे हाकण्यासाठी त्यात प्रॉपेलरचा वापर करण्यात आलेला नाही. जहाजाचा प्रॉपेलर हा सर्वात जास्त आवाज करणारा भाग असतो. त्याशिवाय हे जहाज आपला चुंबकीय मागही कमीत कमी ठेवण्यास सक्षम आहे.

 

            अर्थात असं असलं तरी या जहाजालाही मागे सोडणारी जहाजं बनविण्याचा संकल्प वैज्ञानिकांनी केला आहे. ही जहाजं खऱ्या अर्थाने अदृश्य असतील, असं त्यांचं म्हणणं आहे. या जहाजांसाठी मेटामटेरिअलचा वापर करण्यात येणार आहे. मेटामटेरिअल हे कृत्रिम पदार्थ असून त्यांची कल्पना प्रथम इम्पेरिअल कॉलेज, लंडन येथील भौतिकशास्त्रज्ञ जॉन पेन्ड्री यांनी मांडली होती. या मेटामटेरिअल पदार्थात विशिष्ट विद्युतचुंबकीय गुणधर्म आहेत. हे गुणधर्म नैसर्गिक पदार्थांत आढळत नाहीत. या पदार्थांत प्रकाशाला वळविण्याचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहे. या गुणधर्मामुळे एखाद्या पारदर्शक पदार्थामधून प्रकाश आरपार गेल्याचा भास होतो. असे पदार्थ जर खरोखर बनविता आले तर एखादं जहाज वा वस्तू पूर्णत: अदृश्य करता येईल. मात्र एखादं जहाज पूर्णत: झाकण्याएवढं मेटामटेरिअल तयार करणं हेही एक मोठं आव्हान आहे. शास्त्रज्ञ हे शिवधनुष्य पेलतील का, हेही काळच ठरवेल.

                 :- पंकज कालुवाला


No comments