श्रीकृष्णाची गोवर्धन पूजा


श्रीकृष्णाची गोवर्धन पूजा

आपल्या भारताला नररत्नांची खाण म्हटले जाते. अनेक उच्च कोटीचे महापुरुष येथे जन्माला आले. त्यांनी तशीच उत्तुंग कार्ये आपल्या जीवनकाळात करून दाखविली.या महापुरुषांची कार्ये, त्यांचे जीवन, त्यांची जीवनचरित्रे ही विलक्षण स्फूर्तिदायक व मार्गदर्शक आहेत. काही महापुरुष हे जीवंतपणीच एक आख्यायिका बनून जातात. त्यांच्या मृत्यूनंतर बराच कालावधी गेल्यानंतर या आख्यायिकांना एक दैवी अद्भुताचं वलय लाभतं. असं दैवी अद्भुताचं वलय लाभल्यानंतर त्यांना अनेक अनुयायीही मिळत जातात. अशा अनुयायांसाठी महापुरुषांच्या सांगितल्या जाणाऱ्या आख्यायिका या वस्तुपाठासारख्या असतात. या अद्भुताचं वलय लाभलेल्या आख्यायिकांतूनही महापुरुषांच्या जीवनविषयक विचारांचं प्रतिबिंबही बऱ्याचदा घडलेलं दिसतं. मात्र या अद्भुताच्या वलयामागे महापुरुषांच्या विचारांना, त्यांच्या कृतीमागच्या उद्देशांना काहीसं गौण स्थान देण्यात येतं, त्यांना पद्धतशीरपणे विस्मरणात पाठविलं जातं. महापुरुषांचा वैचारिक पराभव अनेकदा त्यांचे अनुयायीच करतात, असं नरहर कुरुंदकरांनी एका ठिकाणी म्हटलंय आणि जवळ जवळ सर्वच महापुरुषांसाठी हे वाक्य खरं आहे.
        
असाच दैवी अद्भुताचं वलय लाभलेला आणि आपल्या काही अनुयायांकडून वारंवार पराभूत होत राहिलेला महापुरुष म्हणजे भगवान श्रीकृष्ण! श्रीकृष्ण चरित्रातला एक प्रसंग आहे गोवर्धन पूजेचा. तसं आजही अनेक प्रकारच्या पूजा प्रचलित आहेत. श्रीकृष्णाच्या काळात तर विविध प्रकारच्या पुजांचं स्तोम माजलं होतं. श्रीकृष्णाचं गोकुळ वगोकुळवासीय या प्रकारांपासून अलिप्त नव्हते. कृष्णजन्माच्याही कित्येक वर्षे आधीपासूनच गोकुळात इंद्रपूजेची रीत वा परंपरा होती. इंद्राची कृपा असेल तर पाऊसपाणी भरपूर होतं, परिणामी सुखसमृद्धी नांदते असा त्यांचा विश्वास होता. दरवर्षी पर्जन्यराजाची कृपा रहावी, सुखसमृद्धी नांदावी यासाठी तसेच इंद्राचा कोप सहन करावा लागू नये म्हणून हे गोकुळवासीय इंद्रपूजा करीत असत.
        
श्रीकृष्णाच्या जन्मानंतर अशाच एका वर्षी हा इंद्रपूजेचा काळ जवळ आला. साहजिकच गोकुळात इंद्रपूजेची तयारी धुमधडाक्यात सुरू झाली. इंद्रपूजेची ही तयारी पाहून बाल श्रीकृष्णाचं कुतूहल जागं झालं, कुतूहल जागं झालं की मनात प्रश्न तयार होतो अन् मग सुरू होतो उत्तराचा शोध. बालमतीला त्यांचं कुतूहल शमविण्याची हक्काची जागा म्हणजे त्याचे आई-वडील. श्रीकृष्णानेही आपलं कुतूहल शमविण्याचा प्रयत्न केला तो आपल्या माता-पित्यांकडून. माता-पित्यांकडून मिळालेल्या माहितीवर श्रीकृष्णाने बरीचशी अजब व अनेकांना अस्वस्थ करणारी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते नुसती प्रतिक्रिया व्यक्त करून थांबले नाहीतच तर या प्रतिक्रियेची व्यवहारात अमलबजावणी व्हायला हवी असाही हट्ट धरून बसले.
        
इंद्रपूजेच्या प्रचलित रुढीला धक्का द्यायचा हा निर्णय होता. निर्णय मोठा धाडसाचा होता. कालप्रवाहाच्या उलटसूर मारण्याचा होता. इंद्रपूजेच्या प्रचलित रुढीला धक्का देऊन इंद्रपूजे ऐवजी गोकुळवासीयांना विविध प्रकारे उपयोगी पडणाऱ्या गोवर्धन पर्वताची पूजा करण्याचा निर्णय घेण्यात आला व घेतलेला निर्णय प्रत्यक्षातही उतरविण्यात आला. यानंतरचा इंद्राचा कोप, . अतिवृष्टी व कृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे हा भाग अतिशयोक्तीपूर्ण व अतिरंजित आहे. या अतिरंजित भागाला आपण महत्त्व देत असलो तरी या कथेतून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. या कथेतून आपल्याला प्रचलित परंतु अनावश्यक रुढी, परंपरांना धक्का देण्याचा, चाकोरीबद्ध विचारधारा सोडून सारासार विचार करण्याचा तसेच नवविचारांना चालना देण्याचा संदेशपाच हजार वर्षापूर्वी श्रीकृष्णांनी आपल्याला दिला.
         
खरंतर श्रीकृष्णाचा हाच आदर्श आपण डोळ्यांपुढे ठेवला पाहिजे. आजच्या आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या व सुधारणेच्या युगातही आपण श्रीकृष्णासारख्या महापुरुषांसारखं प्रचलित रुढींना तडा  देण्याचे धाडस दाखवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. पूर्वीच्या मानाने आज माणसाला बरेच विचारस्वातंत्र्य आहे. तरी अनेक बाबतीत आपलं नुकसान होत आहे ही जाणीव होऊन देखील आपण चाकोरीबद्ध विचारधारा सोडण्यास तयार होत नाही. अशा चाकोरी बनलेल्या अनेक गोष्टी आहेत, अगदी आपल्या आजूबाजूला आहेत. त्या सामाजिक  आहेत, धार्मिक आहेत, शैक्षणिक आहेत. त्यांना एखाद्या परंपरेचं व जवळ जवळ अपरिहार्यतेचं एक स्वरूप आलं आहे अन् ते तसंच सुरु ठेवण्यात आपल्यालाही एक धन्यता वाटायला लागली आहे.

          या सर्व पार्श्वभूमीवर श्रीकृष्णासारख्या महामानवाने केलेल्या गोवर्धन पूजेचे महत्त्व काही औरच आहे. कोणत्याही गोष्टीमागचे तत्त्व व भलेबुरेपणा समजावून घेऊन योग्य गोष्टीसाठी कृतज्ञता दर्शविण्याचा, उगाच एखाद्या गोष्टीच्या तालावर न नाचता सारासार विचार करण्याचा, कोणतीही रुढी-परंपरा पूर्वीपासून चालत आली म्हणून चालवून न घेता कालसापेक्ष विचार करून योग्ययोग्यता पडताळून पहावी की न पहावी हे ठरविणाऱ्या चिकित्सक वृत्तीचा उपयोग करावा हा संदेश आपल्याला या गोवर्धन पूजेच्या घटनेतून मिळतो.म्हणूनच ही गोवर्धन पूजा महत्त्वाची वाटते.
  
                                                                                          
                                                                         :- पंकज कालुवाला 
                                                                                                

No comments