जन्मठेप चौदा वर्षांचीच कशी ?


जन्मठेप चौदा वर्षांचीच कशी ?
          


          मोठ्यात मोठ्या गुन्ह्यासाठी कडक शिक्षा असावी म्हणून आपल्याकडे जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा दिली जाते. जन्मठेपेच्या शिक्षेचा कालखंड म्हटला तर हा शिक्षेचा कालखंड कैद्याने मरेपर्यंत तुरुंगातच काढायला हवा. पण त्याऐवजी कैद्याला जन्मठेपेची शिक्षा झाली तर जास्तीत जास्त १४ वर्षे तुरुंगात ठेवलं जातं. अर्थात फार पूर्वी जन्मठेप म्हटली तर ती जन्मठेपच असायची. म्हणजे उर्वरित आयुष्य तुरुंगात. पण ही जन्मठेप १४ वर्षांची कशी झाली याचीही एक कथा आहे.
         
ही गोष्ट १८८० च्या दशकातील आहे. या वेळेपर्यंत इंग्रजांनी संपूर्ण भारतभर आपले हातपाय पसरले होते व सुरळीत राज्यकारभारही सुरू केला होता. भारतातला राज्यकारभार चालविण्यासाठी त्यांनी व्हाईसरॉयची नेमणूक केली होती. त्यावेळी व्हाईसरॉय होता अर्ल ऑफ मेयो. भारतात त्याला लॉर्ड मेयो म्हणून ओळखलं जात असलं तरी त्याचं खरं नाव होतं ते रिचर्ड बोर्क, हे मेयो महाशय इ. स. १८७२ साली अंदमानला- काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी विख्यात असलेल्या तुरुंगाला भेट देण्यासाठी गेले होते. अर्थात त्यावेळचे तेथले गुन्हेगार म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटणारे क्रांतिकारकच होते. या क्रांतिकारकांना आपला रूबाब दाखवत हिंडणाऱ्या लॉर्ड मेयोचे दिवस भरले होते. गोऱ्या कातडीचा हा चांडाळ अंदमानातून कधी जिवंत परत जाणारच नव्हता.
        
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्याएका क्रांतिकारकाने खूप दिवसांपूर्वी तुरुंगाच्या स्वयंपाकघरातला एक सुरा लपवून बाजूला ठेवला होता. हाच सुरा त्याला लॉर्ड मेयोचा काटा काढण्यास उपयोगी पडला. सुऱ्याचा वार मेयोसाठी प्राणघातक ठरला. लॉर्ड मृत्यूमुखी पडल्यानंतर अर्थातच क्रांतिकारकावर खटला चालला. या खटल्यातून काय निष्पन्न होणार ते ठरलेलं होतंच. खटल्यावेळी न्यायाधीशांनी या क्रांतिकारकाला लॉर्ड मेयोला ठार मारण्याचं कारण विचारलं. त्यावर त्या स्वातंत्र्यवीराने दिलेलं उत्तर नक्कीच विचार करायला लावणारं होतं. स्वातंत्र्यवीराचं त्या गोऱ्या न्यायाधीशाला उत्तर होतं, “जन्मठेपेच्या या शिक्षेमुळे मी अंदमानातच माझ्या कुटुंबीयांना कधीही' न भेटताच मरणार हे निश्चित होतं. माझं जीवन निरर्थक होतं. यापेक्षा मरण परवडलं. पण मरण्याआधी एक तरी चांगलं काम करावं म्हणून मी व्हाईसरॉयला ठार मारलं." या क्रांतिकारकाची फाशीची शिक्षा तर ठरलेलीच होती. पण त्याच्या कोर्टातल्या या जबाबाने ब्रिटिश सरकारला विचारात पाडलं. जन्मठेपेच्या या शिक्षेमुळे दुसरेही भारतीय कैदी बिथरून आणखी इंग्रजांचा बळी जाऊ नये म्हणून त्यांनी जन्मठेपेची मुदत १४ वर्षांवर आणली. स्वतंत्र भारतानेही इंग्रजांचंच अनुकरण करून शिक्षेची हीच मुदत कायम ठेवली.



                                                                                                :- पंकज कालुवाला 

No comments