डॉल्फीन्सही करतात बारसं


डॉल्फीन्सही करतात बारसं

                   आपणा मानवामध्ये एखादं मूल जन्माला आलं की, त्याचं नाव ठेवणं महत्त्वाचं मानलं जातं. खरं तर मुलाचं होणारं बारसं हा एक प्रकारे मोठा उत्सवच असतो. पुढे हेच नाव त्या माणसाच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा भाग बनत असल्याने ही नाम करण पध्दत मानवाचं खास वैशिष्ट्य बनून गेली आहे. पण माणूस हाच अशा प्रकारे नामकरण करणारा जगातला एकमेवाद्वितीय प्राणी नाही हे सांगायला डॉल्फिनसारखा समुद्री सजीव पुढे सरसावला आहे.

सेंट अॅण्ड्यूज विद्यापीठातील विन्सेंट फ्लोरिडा येथल्या सोरासोटा खाडीत आढळणाऱ्या टर्सिओप्स ट्रन्केटस् ह्या डॉल्फिनच्या प्रजातीवर संशोधन करण्यात आलं. ह्या संशोधनातूनच हे डॉल्फिनही एकमेकांना नावाने ओळखत असल्याची, जणू बारसं करून नाव ठेवत असल्याची मनोरंजक माहिती उघडकीस आली आहे. अजून त्या दृष्टीने जास्त संशोधन सुरू आहे.
        
           या संशोधनादरम्यान असं लक्षात आलं की, प्रत्येक डॉल्फिन एका विशिष्ट प्रकारे शिटीसारखा आवाज करतो. ह्या विशिष्ट शिटीसारख्या आवाजामुळेच त्याचे इतर साथीदार त्याला ओळखत असतात. वैज्ञानिकांनी ह्या वेगवेगळ्या डॉल्फिन्सच्या विशिष्ट शिट्यांचं ध्वनिमुद्रण केलं. हे ध्वनिमुद्रण नंतर डॉल्फिन्सच्या वेगवेगळ्या गटांना ऐकवून त्यांची प्रतिक्रिया नोंदविण्यात आली. यातून दिसलं की, जर शिटीचा आवाज त्यांच्या गटातीलच एखाद्या डॉल्फिनचा असेल तर ते त्या शिटीकडे बारकाईने लक्ष देतात.संवाद साधण्याच्या-बाबतीत डॉल्फिन्स इतर प्राण्यांच्या खूपच पुढे आहेत, यात कोणतीच शंका नाही. काही वैज्ञानिक तर डॉल्फिन्सची पूर्ण विकसित भाषाच असल्याचं सांगतात. अर्थात तसे पुरावे अजून मिळालेले नाहीत. मात्र विविध प्रकारचे शिट्यांसारखे आवाज काढून संवाद साधण्यात ते आघाडीवर आहेत. नावाने हाक मारण्याचा शिटीसारखा आवाज हा त्यातला एक छोटासा भाग आहे. सर्वसाधारणपणे नैसर्गिक अवस्थेत त्यांच्या संवादातील ५० टक्के भाग हा नावाने हाक मारण्याचा असतो. पण ह्या डॉल्फिन्सना जर आपण ते एकमेकांना नेहमीच पाहू शकतील अशा ठिकाणी ठेवल्यास त्यांच्या ह्या नावाच्या शिट्या कमी होतात व इतर प्रकारच्या शिट्या सुरू होतात. त्यांचा अर्थ लावणं अजून तरी वैज्ञानिकांना जमलेले नाही.
         
       रिचर्ड कोनोर ह्या अभ्यासकाच्या मते तर डॉल्फिन्समध्ये नक्कल करण्याचीही क्षमता असते. म्हणजेच त्यांचा एखादा साथीदार नसतानाही ते त्याच्याविषयी गुजगोष्टी करू शकतात. इतर प्राण्यां मध्येही आवाजाच्या चढ उतारांच्या सहाय्याने संवाद साधण्याची पध्दत असली, तरी त्यांच्यात डॉल्फिन्सप्रमाणे विशिष्ट नाव ठेवण्याची पध्दत असल्याचे पुरावे वैज्ञानिकांना मिळालेले नाहीत.


 
                                                                                            © :- पंकज कालुवाला 
                                                                                       
                                                                                            

No comments