परिवर्तन (रूपककथा)

परिवर्तन

विश्वविजयाचा प्रचंड व दुर्दम्य संकल्प मनाशी बांधून तो तरूण राजपुत्र आपल्या सैन्यासह निघाला होता.स्वत:चे साहस,धैर्य,चातुर्य,कल्पकता,उदंड उत्साह या गुणांबरोबरच जीवास जीव देणारे सैन्य व आईचा आशीर्वाद घेऊन निघालेल्या राजपुत्राने देशामागून देश,लधायांमागून लढाया,युद्धामागून युद्धे जिंकली ती आपल्या प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर.

ही प्रचंड व अखंड घोडदौड सतत चालू होती. नुकतीच एक अवघड मोहीम जिंकून आल्यावर हा तरूण राजपुत्र बागेतून नयनरम्यं वनश्री पाहत फिरत होता. वनश्रीचे दर्शन घेत असतानाच राजपुत्राच्या समोर केसांचे संपूर्ण मुंडण केलेला,हाती लांब सोटा व अंगावर करड्या रंगाचे वस्त्र परिधान केलेला तेजस्वी पुरूष उभा राहिला. त्याच्या चेहर्‍यावरिल तेज पाहून राजपुत्र प्रभावित झाला.मंद स्मित करीत तो तेजस्वी पुरूष राजपुत्राला म्हणाला,”राजपुत्रा ! कुठे निघालास ? मी येऊ तुजबरोबर ?”   

त्याबरोबर राजपुत्राने त्या तेजस्वी पुरूषाकडे एक कटाक्ष टाकला. राजपुत्र त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाने आधीच प्रभावित झाला होता. आता त्याच्या वाणीतील सामर्थ्य पाहून त्याच्या मनात एकदम पूज्यबुद्धी उत्पन्न झाली व त्याने आपल्याबरोबर येण्यास आनंदाने संमती दिली. थोड्या अंतरावर गेल्यावर त्या तेजस्वी पुरूषाने राजपुत्रास विचारले, “राजपुत्रा,तू कोणत्या उद्देशाने या मोहिमा आखत आहेस ?”

त्यावर तो राजपुत्र उत्तरला, “महाराज,मी जग जिंकण्याच्या उद्देशाने,जगास आपले अंकित करण्याच्या मनोदयाने या मोहिमांवर आलो आहे.”

राजपुत्राच्या बोलण्यावर सौम्यं शब्दांत तो भिक्षू म्हणाला, “म्हणजे  राजपुत्रा, तू जगास आपले दास बनविण्याच्या उद्देशाने आपली मातृभूमी सोडून इतक्या लांब आला आहेस तर !”

“होय ! आपल्या बाहुबलाच्या-तलवारीच्या जोरावर हे जग जिंकून त्यास आपले मांडलिक बनविणे ही माझी महत्वाकांक्षा आहे. माझ्या महत्वाकांक्षेलाच मी मूर्त स्वरूपात उतरवीत आहे.”

“पण राजपुत्रा, जरा तू आपल्या अवलंबिलेल्या या मार्गाबाबत कधी सारासार विचार केला आहेस ?  स्वत:ची अवास्तव व अवाजवी उच्चाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तू किती निरपराधी, निष्पाप जीवांच्या प्राणाशी खेळ करतोयस. हा रक्तपात, ही हानी केवळ एका नश्वर संपत्तीसाठी अन केवळ सुखोपभोगासाठी ? तुला आपली अविचारी व राक्षसी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा रक्तपात करण्याचा अधिकार कुणी दिला ? ही अराजकसदृश परिस्थिती, शांततेच्या जागी हे भीतीचे साम्राज्यं स्थापण्याचा तुला अधिकारच काय ?”
भिक्षूच्या स्पष्टवक्तेपणाचे त्यास आश्चर्य वाटले. “यात अधिकाराचा प्रश्नच काय ? दुर्बलांबर सबलांची सत्ता प्रस्थापित होणे हा तर सृष्टीचा अलिखित नियमच आहे. या नियमास अनुसरूनच माझे वर्तन आहे. जगावर राज्यं प्रस्थापित करायचे तर तलवारीला पर्याय नाही.

“पण तुला ही शक्ती. हे बाहुबल,हे राज्यपद बहाल करण्यात आले आहे ते त्यांचे रक्षण करण्यासाठी. त्यांचे स्वातंत्र्यं हिरावून त्यांना गुलाम बनविण्यासाठी नव्हे. तुझ्या हाती ही तलवार आहे ती दुष्टांचे निर्दालन व सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी.पण याचा वापर होतो आहे तो रक्तपात करण्यासाठी,अराजकता माजवण्यासाठी,विषमता प्रस्थापित करण्यासाठी,दुसर्‍यांना गुलाम बनवण्यासाठी.अशा शस्त्रांचा,अशा अस्त्रांचा उपयोगच काय ? अशी शस्त्रे मोडीतीच निघायला हवीत. या शस्त्रांच्या दहशतीने मानवी मनाला फार थोड्या काळाकरिता ताब्यात धरून ठेवता येते,त्यावर हुकूमत गाजवता येते. अशी हुकूमत क्षणार्धात नाहीशी होते,कोलमडून पडते. तू आपल्या तलवारीच्या जोरावर आतापर्यंत भयंकर नरसंहार करून सर्वत्र धावपळीचे,दहशतीचे साम्राज्यं उभे केले आहेस. तसे पाहता मानवी मन हे संवेदनक्षम. या दहशतीऐवजी लोकांना गरज असते प्रेमाची, प्रेमाने वागनविण्याची,समजून घेण्याची. सततच्या लढायांमुळे पाहा हा आजूबाजूचा मुलूख कसा उजाड,वैरण झाला आहे. येथल्या माणसांवरच काय, पण पशू-पक्षी,झाडापनांवरदेखील दहशतीची छाया पसरली आहे. माणसाला गरज असते ती शांत वातावरणाची. शांततेच्या काळात प्रत्येक जण आपापल्या नित्यक्रमात गर्क असतो.त्याचा परिणाम राष्ट्राच्याच नव्हे तर विश्वाच्याही उत्थानात होतो. तर त्याउलट त्यांना दास बनविल्याने समाजात विषमता निर्माण होते. मनुष्याचे माणूस म्हणून जगण्याचे सर्व हक्कं नाकारण्यात येतात. तुझ्यात आणि सामान्यं दासात फरक तो काय ? तुला व त्याला दोन हात, दोन पाय, दोन डोळे ,दोन कान, त्याला व तुला एकच डोके,भूक लागणारे पोट. मग त्याला तू तुझ्यापेक्षा हीन म्हणून का वागवावे ? निसर्गाने मानवाला विचार करण्याची शक्ती प्रदान केली आहे. त्याचा उपयोग तू दासाच्या दृष्टीने विचार करण्यासाठी केलास ?”

“नाही महाराज,तशी गरजच कधी मला पडली नाही.”

“राजपुत्रा! तू केवळ तुझेच सुख पाहिलेस.यामुळे माणसामाणसातील दरी वाढत जाते. एकमेकांना दुसर्‍याच्या सुखाचा हेवा वाटून वासना निर्माण होते. वासना निर्माण झाली की, ती भागविण्यासाठी, ती तृष्णा शमविण्यासाठी चढाओढ लागते अन सर्व दु:खास,रक्तपातास कारणीभूत अशी वर्चस्वाची भावना निर्माण होते. ही भावना वाढीस लागली की, सबल-निर्बल, गरिब-श्रीमंत असा झगडा सुरू होतो. या झगड्यात कुणीच सुखी होत नाही. मात्र जीवनास एक अनिश्चितता,दहशत प्राप्त होते. समोर असलेली व्यक्ती ही माझ्याच दर्जाची आहे.माणूस म्हणून तिचेही जगण्याचे,वावरण्याचे काही हक्कं आहेत. तिलाही ते मिळावेत यासाठी जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा सार्वत्रिक बंधुभाव निर्माण होतो व हा बंधुभाव अनिश्चितता व दहशत संपविण्यासाठी उपयोगी पडतो. म्हणून हे राजपुत्रा, तू आपले नश्वर आणि क्षणिक वैभव वाढविण्यासाठी व्यर्थ रक्तपात चालविला आहेस तोही व्यर्थच आहे. हे जीवन आधीच यातनांची खाण आहे. त्यात तू आणखी भर टाकतो आहेस.तू आपल्या शरीराचे चोचले पुरविण्यासाठी जो जग जिंकण्याचा निरर्थक खटाटोप चालविला आहेस तो अस्थायी आहे. तो कधी ना कधी नाश पावणारच ! परंतु या प्रलयात अनेकांच्या जीवनाची मात्र राखरांगोळी होणार आहे. या जगात शाश्वत, चिरंजीवी असे काही नाही. तेव्हा तू विश्वविजयाच्या गृष्टीने जो रक्तपात चालविला आहेस तो फोल आहे. जगाला तलवारीची गरज नाही,तर प्रेमाची गरज आहे. प्रेमाने प्राणिमात्रांना जिंकता येते,आपलेसे करता येते. ज्या गोष्टी दहशतीने करता येत नाहीत त्या प्रेमाचे दोन गोड शब्द बोलण्याने साध्यं होतात. तर याउलट सततच्या युद्धपरिस्थितीमुळे राज्येच्या राज्ये, साम्राज्ये नाश पावतात, सुंदर नगरे,शेते उजाड होतात. परिणामी लोक अन्नं, वस्त्रं, निवारा या आपल्या मूलभूत गरजांना पारखे होतात. युद्धाची झळ दोन्ही बाजूंना सारखी सोसावी लागते. अपमानास्पद स्थिती प्राप्त झाल्यामुळे वैमनस्यं वाढीस लागते. याची परिणिती विनाशात होते. तेव्हा काही कारण नसताना या विनाशाला निमंत्रण देण्याचे कारणच काय ?”

बुद्धांच्या मुखांतून बाहेर पडत असलेले ते ओजस्वी शब्द जगज्जेतेपदाची स्वप्ने पाहात असलेला सिकंदर एकाग्रपणे ऐकत होता, आपल्या अंत:करणात साठवत होता. थोड्या वेळाने भरल्या अंत:करणाने बुद्धांच्या चरणांजवळ झुकून तो म्हणाला,”महाराज, मी चुकलो. तारूण्याच्या या उत्साहात माझ्या हातून अनेक चुका घडल्या. माझ्या या कृत्यांतील फोलपणा माझ्या ध्यानात आला आहे.”

राजपुत्राचे हे पश्चातापदग्ध बोलणे ऐकून बुद्ध त्यास म्हणाले,”राजपुत्रा,आपल्या हातून घडलेल्या वाईट कर्मांवर पश्चाताप करणाराच खरा माणूस असतो. तर आपल्या वाईट कृत्यांवर खूश होणारा,त्यातून आनंद मिळवणारा मानूस राक्षस असतो. माणूसपणाची साक्ष तू दिली आहेस. तेव्हा आपल्या राज्यात परत जा व लोककल्याणकारी कामे कर. तेव्हाच तू लोकांच्या हृदयावर राज्यं करशील. लोक आदराने तुझे आदराने नाव घेतील.”

बुद्धांच्या तत्वज्ञानाने ,शिकवणुकीने मनाचा खोल वेध घेतलेला तो राजपुत्र उठला व आपल्या सैन्यासह , नव्या मनुसह स्वत:वर स्वत:वर विजय मिळविण्याच्या आकंक्षेने स्वदेशी रवाना झाला.


                                                  ©  :- पंकज कालुवाला     

No comments