अलेक्झांडर – हेर आणि राज्यकर्ता


                            अलेक्झांडर – हेर आणि राज्यकर्ता

©पंकज कालुवाला

                       
                                हेरगिरी हा जगातल्या सर्वात प्राचीन व्यवसायांपैकी एक व्यवसाय मानला जातो. त्याची नेमकी सुरूवात कधी,कोठे व कशी झाली ह्याविषयी इतिहास मौन बाळगून आहे. मात्र कुठलीही राज्यव्यवस्था वा शासंव्यवस्था प्रभावी हेरगिरी यंत्रणेशिवाय टिकू शकत नाही हे एकशेएक टक्के सत्यं आहे. गुप्तचर व्यवस्थेचं महत्त्वं विशद करणारा एक किस्सा आपण येथे पाहणार आहोत. किस्सा प्राचीन आहे आणि म्हणूनच जास्त महत्त्वाचा आहे.


                        काळ होता साधारणत: इ.स. पूर्व सव्वातीनशे वर्षांपूर्वीचा. स्थळ होतं पूर्वीचा पर्शिया व आताचा इराण तसेच प्राचीन भारतातल्या सीमावर्ती भागातलं. छोट्या मोठ्या टेकड्यांनी-पहाडांनी व्यापलेल्या त्या भागात एका विशाल सैन्याचा तळ वसला होता. हा तळ होता संपूर्ण जग आपल्या आधिपत्याखाली आणण्याची दुर्दम्यं महात्त्वाकांक्षा घेऊन स्वारीवर निघालेल्या अलेक्झांडरचा. सूर्य कधीचाच माथ्यावर येऊन मावळतीच्या मार्गाला लागला होता. दुपारच्या भोजनानंतर अलेक्झांडर आपल्या रेशमी शामियान्यात विश्रांती घेत पहुडला होता.त्याचा शामियाना तळाच्या मध्यभागी इतर सेनाधिकार्‍यांच्या तंबूच्या मधोमध सुरक्षित होता.
                        अलेक्झांडर आता दुपारची विश्रांती घेत असेल हे माहीत असल्याने त्याच्या शामियान्याकडे जाण्याचे धाडस कुणी करत नव्हते. तरीही अपवादाने एक व्यक्ती सावध पावले उचलत, आजूबाजूचा कानोसा घेत त्याच शाअमियान्याच्या दिशेने चालली होती. त्या व्यक्तीने अंगाभोवती मळकट चादर पांघरली होती. पायातल्या पादत्राणांचा पत्ता नव्हता. अंग धुळीने माखले होते. केस विस्कटले होते. अंगावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या. त्या चिघळून त्यांतून पू वाहात होता. त्या सर्वांची पर्वा न करता ती कळकट व्यक्ती अलेक्झांडरच्या रेशमी शामियान्यापाशी येऊन उभी राहिली अन तेथल्या पहारेकर्‍याला म्हणाली, “मला महाराजांना भेटायचं आहे.”
                        त्या पहारेकर्‍याने त्या व्यक्तीच्या अवताराकडे एक तुच्छतादर्शक कटाक्ष टाकला. मात्र त्याने त्याला तेथे अडविले नाही की हाकलूनही दिले नाही. पहारेकर्‍याच्या चेहर्‍यावरील भावाची कोणतिही पर्वा न करता ती कळकट व्यक्ती आत शामियान्यात शिरली. त्यावेळी अलेक्झंडरही वर्दी मिळाल्यावर आपल्या शय्यासनावर सावध होऊन बसला होता. ती व्यक्ती त्याच्यासमोर उभी राहिली तेव्हा तो आपल्यासमोर पसरलेला नकाशा तपासण्याचा अभिनय उत्तम रितीने वठवत होता. आपली नजर नकाशावरून काढून सरळसरळ त्या आगंतुकाच्या नजरेला भिडवत अलेक्झांडरने त्याला विचारले, “कुणी तुला पाहिले तर नाही ?”
                        आगंतुकाने अगदी नम्रं स्वरात उत्तर दिले, “नाही महाराज!”
                        “ते सगळ्यात जास्तं महत्वाचे आहे.” त्याचवेळी सम्राटाचा हात आपल्या कंबरेला लटकवलेल्या खंजिरावर स्थिरावला.
                        आगंतुकाला आपल्या मालकाच्या कृतीचा अर्थ बरोबर कळाला. त्याने क्षणाचीही उसंत न घेता म्हटले, “होय महाराज !”
                        “तू आणलेली खबरही महत्त्वाचीच असणार.लवकर सांग.” बातमी जाणून घेण्यासाठी अलेक्झांडर उताविळ झाला होता.
                        आगंतुक आपल्या जागेपासून थोडा पुढे सरकला. थोडा पुढच्या दिशेला वाकला अन शक्यं तितक्या धीम्या स्वरात कुजबूजला, “आपले काही साथीदार असंतुष्टं आहेत महाराज.”
                        पुढच्याच क्षणी अलेक्झांडरच्या विशाल भालप्रदेशावर आठ्यांचं सामाज्यं पसरलं. भुवया वक्रं झाल्या.संतापाने त्याने आपल्या हाताची मूठ जवळच्या नकाशावर आपटली. “माझ्या साथीदारांना हवे काय ? ग्रीस आणि तेथली संपत्ती ह्यात त्यांना मी वाटेकरी करून घेतले आहेच....,” बोलतानाच त्याची बोटं नकाशावरून सराईतपणे फिरत होती. तो पुढे म्हणाला, “पर्शीया आणि आजूबाजूची साम्राज्यं आम्ही जिंकली,तेथली संपत्ती अंकित केली अन आता भारताचं विशाल साम्राज्यं व तेथली अमाप साधनसंपत्ती आम्हाला खुणावतेय. भारताला नमवल्यानंतर ही संपत्ती मिळणार कुणाला?...त्यांनाच ना ?...मग त्यांना आणखी हवे काय ?”
                        संतापाने लालबुंदं झालेल्या अलेक्झांडरचा हा भयानक आवेश कुणी पाहीला असता तर तो भीतीने जागच्या जागी थिजला असता.....
                        ....पण आगंतुक मात्र शांतच होता. आपण दिलेल्या बातमीनंतर सम्राटाची अशीच प्रतिक्रिया होईल ह्याची त्याला कल्पना होतीच. संतापाच्या भरात सम्राट त्याचा खंजिर आपल्या छातीत खुपसेल ह्याची त्याला चांगलीच कल्पना असूनही तो न डगमगता तेथेच उभा राहिला. अजून त्याला आपल्या मालकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे होते. “ त्यांना आपल्या घराची ओढ लागून राहिली आहे, महाराज,” आगंतुक म्हणाला.
                        अलेक्झांडरच्या डोळ्यात अंगार फुलला. तिरस्काराने त्याचे ओठ वेडेवाकडे हलले आणि त्यांतून शब्द बाहेर पडले, “जाल !... नक्की घरी जाल !... पण माझा हा देह पडल्यानंतरच !”
                        अलेक्झांडरच्या ह्या उद्गाराबरोबरच आगंतुकाचं अंगं एकवार शहारलं. आपली उरलीसुरली हिंमत एकवटून तो म्हणाला, “महाराज, त्याची त्यांना चांगलीच कल्पना आहे. म्हणून तर ते पुढच्या तयारीला लागले आहेत.”
                        “अच्छा ! माझ्या हत्येचा कट काय ! मला ठार मारून परत जायचा कट आखलाय का ह्या मंडळींनी ?” अलेक्झांडरच्या स्वरातला संताप लपत नव्हता.
                        “महाराज, मी तसं ऐकलय खरं !”, आगंतुक म्हणाला.
                        “कट रचणारी ही माणसं आहेत तरी कोण ?”
                        “ते मला नाही सांगता यायचं महाराज. ते त्यांच्या मसलतीच्या तंबूजवळ आम्हाला फिरकूही देत नाहीत.मी लपून त्यांचं जे बोलणं ऐकलं त्यावरूनच हा अंदाज बांधला.” आगंतुकाने आपली व्यथा व्यक्त केली.
                        “तू त्यांचे आवाज ओळखू शकशील ?” अलेक्झांडरचा प्रश्न.
                        आगंतुकाने नकारार्थी मान हलवली.
                        अलेक्झांडरच्या चेहर्‍यावर संताप आणि थोडी निराशा ह्यांचं मिश्रण दिसू लागलं. हातानेच इशारा करून त्याने आगंतुकाला जायला सांगितले. त्याआधी आपल्याजवळील थैलींतून एक सोन्याचे नाणे काढून त्याने त्या आगंतुकाच्या दिशेने भिरकावले. त्या नाण्याची लकाकी आगंतुकाच्या रापलेल्या चेहर्‍यावर दिसू लागली. पण तो पुढे तेथे थांबलाच नाही. सावधगिरीने तंबूबाहेर पडून तो बाहेरच्या गर्दित दिसेनासा झाला.
                         

                              आगंतुक तेथून बाहेर पडल्यावर अलेक्झांडर पुन्हा आपल्या शय्यासनावर आडवा झाला.त्याने आपले डोळे मिटून घेतले . वरवर पाहणार्‍या कुणालाही आपला सम्राट गाढ निद्राधीन झालाय असे वाटले असते.पण तसे नव्हते. त्याने नीट निरखून पाहिले असते तर त्याला त्याची मुद्रा विचारमग्नं आहे हे दिसले असते. अलेक्झांडरच्या मनात विचारांचे काहूर माजले आहे, हे त्याच्या चेहर्‍यावरील स्नायूंच्या हालचालींवरून दिसत होते. त्यात बराच वेळ गेला. अस्ताचलाला चाललेला सूर्यनारायण केव्हाचाच अस्तंगत झाला. अंधाराचे साम्राज्यं दाटून आले तसे छावणीतले पलिते पेटले. गर्दी आवरली. सर्वत्रं भयाण शांतता पसरली. अधूनमधून होणारी कोल्हेकुई,कुत्र्यांचे भुंकणे व पलित्यांची फडफड तेव्हढी ह्या शांततेचा भंग करत होती. अर्थात त्याचा कोणताच परिणाम अलेक्झांडरच्या विचारचक्रावर होत नव्हता. रात्रं अधिक गडद होत गेली तरी तो आपल्या शय्यासनावरून उठला नव्हता अन आपल्या विचारचक्राचा वारू थांबविलाही नव्हता.  
                                    असाच किती वेळ गेला माहीत नाही. आजूबाजूचं जग निद्राधीन झालं असताना अलेक्झांडरने आपले डोळे उघडले. विचारचक्रांचा वारू शमला होता. काहीतरी ठाम निश्चय झाला होता. तो हळुवारपणे आपल्या शय्यासनावरून उठला. पावलांचा आवाज होऊ न देता दरवाज्यापाशी गेला. टाळी वाजविली. हा संकेत पहार्‍यावर उभ्या असलेल्या पहारेकर्‍याला कळला. पहारेकरी अदबीने आत आला. त्याला अभिवादन करण्याचीही संधी न देता अलेक्झांडरने फर्मान सोडले, “सेनापती पार्मेनियनना घेऊन ये.”
                                    आदेश स्पष्टं असला तरी पहारेकरी मनांतून थोडा विचलीत झाल्यासारखा दिसला. पण आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर परिणाम कोणते होतील ह्याचा अंदाज असल्याने तो वेळीच भानावर आला. त्याने आपल्या सम्राटाचा आदेश सेनापती पार्मेनियनपाशी पोहचता केला तेव्हा तो वयोवृद्ध सेनापती निद्राधीन झाला होता. परंतु आपल्या सम्राटाचा निरोप कानी पडताच तो वृद्धं पण इमानी सेनानी सावध झाला. आपले ट्युनिक अंगावर चढवले; सपाता पायात सारल्या आणि तो तडक सम्राटाच्या शामियान्याच्या दिशेने चालू लागला. पार्मेनियनचा तंबू सम्राटाच्या शामियान्यापासून थोडा लांब होता. हे अंतर कापेपर्यंत पार्मेनियनचा मेंदू सम्राटाने ह्या अवेळी आपल्याला का बोलावलं असावं ह्याचा अंदाज घेण्यात गुंतला होता. अंदाज काही त्याला घेता आला नाही. सम्राटाचा शामियाना समोर दिसला तेव्हा पार्मेनियनने आपल्या मनातील विचारांची जळमटं झटकून टाकली. शामियान्याच्या दारात तो पोहोचला तेव्हा क्षणभर तेथेच थबकला. आपल्या केसांवर हात फिरवून ते नीटनेटके केले अन दारांतून वाकून आत गेला. आपले नेहमीचे लष्करी अभिवादन करून तो सम्राटाच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागला.   
                                    पार्मेनियन वयोवृद्ध झाला असला तरी कसलेला सेनानायक आहे आणि त्यातही तो आपल्याशी पूर्णपणे प्रामाणिक आहे, हे अलेक्झांडरला माहीत होते. त्याला पार्मेनियनविषयी खूप आदर होता. त्याने त्याचे हसून स्वागत केले व आसन ग्रहण करण्यास सांगितले.
                                    पार्मेनियन आसनावर बसत असतानाच अलेक्झांडर त्याला म्हणाला, “पार्मेनियन, आपल्याला एव्हढ्या रात्री येथे बोलावले ह्याबद्दल क्षमा करा.”
                                    पार्मेनियनच्या चेहर्‍यावर स्मितहास्याची एक लकेर उमटली. तो म्हणाला, “महाराज,मी त्यासाठीच तर आहे. आपण एव्हढ्या रात्री मला बोलावलं, त्याचा अर्थ तसंच महत्त्वाचं काम असलं पाहिजे, हे मला समजतं.”
                                    अलेक्झांडरचा चेहरा उजळला. होकारार्थी मान डोलावून तो म्हणाला, “हो ! नक्कीच ! आपली माणसं घरापासून खूप लांब राहिली आहेत, ही चिंता मला आतल्या आत पोखरते. आपल्या मायभूमीशी आपली ताटातूट झाल्याला आता जवळजवळ दोन वर्षे होत आली आहेत. घरच्या आठवणींनी आपले काही लोक नक्कीच बेजार झाले असतील.”
                                    पार्मेनियनला ते पटलं. त्याने होकार भरला. म्हणाला, “त्यांना आपल्या कुटुंबाची चिंता असणं स्वाभाविक आहे.”
                                    “सर्वांचीच अशी अवस्था झालीय ?” पार्मेनियनकडे एक तिरका कटाक्ष टाकून अलेक्झांडरने विचारले.
                                    पार्मेनियनला त्यातली खोच लक्षात आली. तो स्वत:शीच हसला. अलेक्झांडरकडे पाहून म्हणाला,    “महाराज, माझा मुलगा निसियस माझ्याबरोबर आहे. इतरांपेक्षा मी स्वत:ला खूपच भाग्यवान समजतो.” एव्हढे बोलल्यानंतर पार्मेनियनने अलेक्झांडरपुढे आपली मान किंचीत लवविली.   
                                    आपल्या ह्या ज्येष्ठं सेनानायकाविषयी अलेक्झांडरच्या मनात पुन्हा एकदा आदराचं भरतं आलं. तो त्याला म्हणाला, “पार्मेनियन, तुम्ही भाग्यवान खरेच. पण इतरांनाही हे भाग्यं लाभायला हवं. त्यांना आपल्या कुटुंबाशी नियमित संपर्कात राहता यावं म्हणून मी त्यांच्यासाठी पत्रव्यवहाराची खास सोय करणार आहे.”
                                    अलेक्झांडरने आपलं बोलणं संपवलं. पण पार्मेनियनच्या चेहर्‍यावर असहमतीचे भाव दाटून आले होते. अलेक्झांडरला आपल्याकडून उत्तराची अपेक्षा आहे हे ओळखून त्याने आपलं तोंड उघडलं. “महाराज, आपण आधीही तसा प्रयत्न केलाय. पत्रपाठविण्यासाठी अगदी चांगल्या गाड्याची सोयही आपण केली होती. पण काहीही उपयोग झाला नाही. ह्या गाड्या मध्येच कोठेतरी लुटारूंनी किंवा समुद्रमार्गे नेताना चाच्यांनी लुटल्या.”
                                    अलेक्झांडरकडेही उत्तर तयार होतं. “लुटालुटीची चिंता बाळगण्याचं काहीच कारण नाही. त्याचा चांगला बंदोबस्त मी करणार आहे. पत्रांच्या गाड्यांबरोबर ह्यावेळी हत्यारबंद सैनिकांची एक तुकडीही असणार आहे,” अलेक्झांडर म्हणाला.
                                    अलेक्झांडरचं म्हणणं ऐकून पार्मेनियनला मनस्वी आनंद झालेला दिसला. तसे त्याने बोलूनही दाखवले. पार्मेनियन म्हणाला, “ही योजना खरोखरंच सुंदर आहे. आपल्या लोकांना ती नक्कीच आवडेल.”
                                    ह्यावर अलेक्झांडरने पार्मेनियनला एक अनपेक्षित प्रश्नं केला, “मी आपल्या लोकांना आवडेनासा झालोय का ?”
                                    पार्मेनियनचा चेहरा पडला. तो गोंधळला. पण त्याने लगेचच स्वत:ला सावरले. त्याने अलेक्झांडरला म्हटले, “नाही महाराज्; तसं काही नाही. ते अजूनही तुमच्यावर तेव्हढंच प्रेम करतात.”
                                    “सर्व लोक ?”अलेक्झांडरच्या शब्दांना धार आली होती.
                                    “होय महाराज, सर्वच जण.....” पार्मेनियन.
                                    अलेक्झांडरने पार्मेनियनच्या सुरकुतलेल्या पण तेजस्वी चेहर्‍याकडे मोठ्या प्रेमाने पाहिले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून तो त्याला म्हणाला, “पार्मेनियन तुम्ही अंतर्बाह्यं  चांगुलपणाचं प्रतिक आहात. तुम्हाला सगळं चांगलंच दिसतं. मित्रांचेही चांगलेच गुण तुम्हाला दिसतात. वाईट असं काही तुमच्या नजरेला दिसतच नाही. पण माझा तुमच्यावर विश्वास आहे. अन हा विश्वास आपल्या सैन्यातल्या कुठल्याही अधिकार्‍यापेक्षा जास्तं आहे.”
                                    पार्मेनियनने आपल्या सम्राटाचे आभार मानले.
                                    तो जायला निघाला.
                                    अलेक्झांडरने त्याला थांबवून म्हटले, “उद्या मसलतीच्या वेळी मी आपल्या ह्या टपालाच्या योजनेची माहिती सर्वांना देणार आहे. ही टपालगाडी संध्याकाळी येथून रवाना होईल.”
                                    पार्मेनियनने होकारार्थी मान डोलावली व शामियान्यांतून बाहेर पडला.


                                   
                                    दुसर्‍या दिवशीची सकाळ उजाडली. सर्वजण मसलतीसाठी एकत्रं जमले. ते  आपल्या सम्राटाची वाट पाहू लागले. तो अजून तेथे आला नव्हता. एक पार्मेनियन सोडला तर बाकीच्या सर्वांनीच आजची मसलत एखाद्या लष्करी व्यूहरचनेभोवती किंवा मोहिमेभोवती फेर धरेल अशी अटकळ बांधली होती. त्याची आपसांत कुजबूज सूरू असतानाच अलेक्झांडरचे तेथे आगमन झाले. मसलतीच्या तंबूत एकदम शांतता पसरली. सर्वजण उठून उभे राहिले. आपल्या आसनापाशी पोहोचल्यानंतर अलेक्झांडरने आत्तापर्यंत विश्वासू असलेल्या आपल्या साथीदारांकडे पाहिले. तो आपल्या आसनावर बसल्यावर इतरांनीही आपली आसनं स्वीकारली.
                                    अलेक्झांडर आता काय बोलतो ह्याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यांची उत्सुकता जास्त ताणून न धरता त्याने आपली संपूर्ण योजना मसलत कक्षात उपस्थित असलेल्या साथीदारांपुढे मांडली. एव्हढेच नव्हे तर आजचा दिवस पत्रव्यवहारासाठीचा असल्याचेही त्यांना त्याने सांगितले. संध्याकाळपर्यंत ही पत्रं लिहून पूर्ण करावित व त्याचवेळी ही पत्रं त्यांच्या प्रियजनांपर्यंत खात्रीने पोहोचतिल ह्याची हमीही त्याने आपल्या साथीदारांना दिली. टपालगाडी विशेष सुरक्षाव्यवस्थेत संध्याकाळी रवाना होत असल्याचे त्याने म्हटले.
                                    अलेक्झांडरच्या ह्या विचित्र घोषणेचे सर्वांना आश्चर्य अन आनंदही वाटल्याचे दिसत होते. लागलीच सर्वजण कामाला लागले.
                                    संध्याकाळ सरली अन सूर्य मावळतीला आपल्या कवेत घ्यायला झेपावू लागला तेव्हा टपालगाडीही आपल्या प्रस्थानाच्या तयारीला लागली. टपालगाडी टपालाच्या पिशव्यांनी काठोकाठ भरली होती. विशेष संरक्षक सशस्त्रं तुकडीचा तिला वेढा पडला होता. आज्ञा मिळताच हा सगळा काफिला मावळतीच्या दिशेने प्रस्थान करू लागला.
                                    वेळ सरत गेली तसा टपालगाडीचा काफिला छावणीवरून क्षणाक्षणाला दिसेनासा होऊ लागला. आजूबाजूला अंधाराचे साम्राज्यं पसरले तरी काफिल्याने आपला प्रवास थांबवला नव्हता. प्रवासाचा मार्ग आता छोट्या-मोठ्या टेकड्यांच्या प्रदेशांतून जात होता. काफिला सावधपणे पुढे सरकत होता. त्या मार्गातल्या एका टेकडीवर एक मानवाकृती बसली होती. कफिल्याचं पुढे सरकणं ती आपल्या तीक्ष्णं नजरेने टिपत होती. लांबवर दिसणारा काफिला हळूहळू अगदी जवळ येऊन ठेपला अन त्या टेकडीच्या पायथ्याखालून पुढे जाऊ लागला. आतापर्यंत दगडासारखी निश्चल असलेली ती मानवाकृती हलली, उठली आणि वेगळी वाट पकडून टेकडीचा पायथा गाठायला धावू लागली. त्या मानवाकृतीने पायथा गाठला तेव्हा तिचा सामना टपालगाडीच्या मुख्यं सुरक्षारक्षकाशी झाला. तिला तसं अनपेक्षितपणे समोरं आलेलं पाहून सुरक्षारक्षकाने आपल्या तलवारीला हात घातला. तेव्हढ्यात त्या मानवाकृतीने आपल्या चेहर्‍यावरील बुरखा दूर केला.
                                    सुरक्षारक्षकाचा हात तेथल्या तेथे थांबला अन मोठ्या अदबीने त्याच्या तोंडून शब्दं बाहेर पडले, “महाराजांचा विजय असो !”
                                    अलेक्झांडरनेही आपल्या ह्या सर्वोत्तम सुरक्षारक्षकाच्या अभिवादनाचा स्वीकार केला. नंतर कडक शब्दांत आज्ञा सोडली, “ आता आपल्याला येथे थांबायचे आहे. पडाव टाकण्याची तयारी करा. आपल्या सर्व माणसांना जेवायला द्या. त्यांना मुळीच दारू द्यायची नाही. त्यांच्यापैकी कुणीही झोपी गेलेलं मला अजिबात आवडणार नाही. मशाली पेटवा. मला थोडं वाचन करायचं आहे.”
                                    लगेचच अलेक्झांडरच्या हुकूमाच्या अंमलबजावणीला सुरूवात करण्यात आली. डेरे टाकण्यात आले. सैनिकी तुकडीने सुरक्षाव्यवस्थेची बांधणी केली. नोकरवर्ग जवळून सरपण आणण्यात गुंतला. स्वत: सम्राट अलेक्झांडरही कामात गुंतला होता- पत्रंवाचनाच्या.
                                    काळ जाऊ लागला. वाचल्या गेलेल्या पत्रांचा ढिगही वाढत जाऊ लागला. अलेक्झांडरच्या पायाशीच पत्रांचा एक मोठा आणि एक छोटा ढिग पडला होता. पहार्‍यावरिल सुरक्षारक्षक आणि त्यांचा प्रमुख आपल्या सम्राटाच्या कृतीकडे लक्षपूर्वक पाहात होते. अचानक अलेक्झांडरने वर पाहिले अन सुरक्षाप्रमुखाला जवळ बोलावले. पत्रांच्या छोट्या ढिगाकडे बोट दाखवून अलेक्झांडर त्याला म्हणाला, “ही पत्रं पाहिलीस ? ह्याच पत्रात मला हवी असलेली सर्व माहिती आहे. ह्या लोकांनी मला ठार मारण्याचा अन घरी परत फिरण्याचा कट केलाय. पत्रंलेखकांनी आपल्या कुटूंबियाना त्याची माहिती दिली आहेच पण काही जणांनी तर त्यांची नावंही उघड केली आहेत. त्यांना जगण्याचा कोणताही अधिकार नाही.”
                                    “खरं आहे महाराज !” सुरक्षाप्रमुख म्हणाला.
                                    अलेक्झांडरला सुरक्षाप्रमुखाच्या स्वरातली आश्वासकता जाणवली. तो सुरक्षाप्रमुखाला विश्वासात घेत म्हणाला, “मी त्या सर्वांची यादी तयार केली आहे. ही टपालगाडी येथेच राहू द्या अन आपली सगळी माणसं घेऊन माझ्याबरोबर छावणीत चला. सगळ्या कटकर्त्यांना रात्रीच्या वेळीच जेरबंद करायला हवं. तुझ्यावर मी एक मोठी जबाबदारी टाकतोय. त्या प्रत्येकाला एकेकट्याला माझ्या शामियान्यात घेऊन ये. तेथेच मी त्यांचा कबुलीजबाब घेईन आणि नंतर त्यांना देहदंड द्यायची जबाबदारी तुझी.”
                                    “होय महाराज, आपल्या हुकूमाची तामिली होईल,” सुरक्षारक्षक ठाम शब्दात म्हणाला.
                                    “ठीक ! तर मग निघण्याची तयारी करा.”


                        मध्यरात्रं उलटून गेली अन ग्रीक सैन्याच्या छावणीत एकच हलकल्लोळ उडाला. निद्राधीन असलेल्या कटकर्त्यांना एकेक करून काळजीपूर्वक ताब्यात घेण्यात आले. कडक बंदोबस्तात त्यांना जखडूनही ठेवले गेले. स्वत: अलेक्झांडर त्यांचा निवाडा करत नाही तोपर्यंत त्यांना तसेच ठेवण्यात येणार होते.
                        छावणीत उडालेल्या ह्या हलकल्लोळाची माहिती पार्मेरियनच्या कानावर गेली. वृद्ध सेनापती हादरला. त्याने तडक अलेक्झांडरचा शामियाना गाठला अन आपल्या सम्राटापाशी, “ हे काय चाललय महाराज ?.........” अशी पृच्छा केली.
                        अलेक्झांडरने एकवार आपल्या वयोवृद्ध परंतु इमानी सेवकाकडे पाहिले. काहीही न बोलता त्याने एक पत्रं पार्मेनियनच्या हातात दिले. पार्मेनियन त्या पत्राची घडी उलगडून वाचायच्या तयारीत असतानाच अलेक्झांडर त्याला म्हणाला, “ पार्मेनियन, आपल्यात काही स्वामीद्रोही लपून बसले आहेत.”
                        पार्मेनियनचा आपल्या कानावर विश्वास बसला नाही. तो ते पत्रं वाचत असताना त्याचा चेहरा मात्रं काळवंडू लागला. त्याला अनंत वेदना होताहेत हे त्याच्या चेहर्‍यावरील बदलणारे भाव पाहून कुणालाही सांगता आलं असतं. परंतु कुठेतरी त्याचं मन हे सर्व खरं मानायला तयार नव्हतं. उसनं अवसान आणून तो म्हणाला, “हिप्पोथेलस ?....आणि स्वामिद्रोही ?...विश्वास बसत नाही....,”
                        अलेक्झांडर खिन्नंपणे हसला. अविश्वासाने आ वासलेल्या पार्मेनियनला तो म्हणाला, “पार्मेनियन,मी कालच तुम्हाला म्हणालो होतो की, लोकांचा चांगुलपणा तेव्हढा तुम्हाला दिसतो. पण हा त्यांच्याच हस्ताक्षरातला त्यांच्याच विरूद्ध जाणारा पुरावा आहे. हिप्पोथेलस आणि इतरांनाही मला देहदंड द्यावा लागणार आहे.”
                        “आपला निर्णय योग्यं आहे , महाराज,”पार्मेनियन पुढे म्हणाला, “ स्वामीद्रोह्यांना देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरा पर्याय नाही.”
                        आपलंही हेच मत आहे हे ऐकून आनंद वाटला,”अलेक्झांडर म्हणाला. दुसर्‍याच क्षणी त्याने अगदी कडक शब्दात आज्ञा सोडली, “पहिल्या द्रोह्याला आत घेऊन या !”
                        शिपायांनी जेरबंद केलेल्या तरूण अधिकार्‍याला धक्के देत आत आणलं. तो अधिकारी मजबूत होता,तेजस्वी होता. त्याला काबूत आणण्यासाठी शिपायांना बरीच मेहनत करावी लागली होती. त्याने त्यांना बराच प्रतीकार केला होता. त्याच्या चेहर्‍यावरील ताज्या जखमा व त्यातून वाहणारं रक्तं त्याचीच साक्षं देत होतं. त्या तरुण अधिकार्‍याचा चेहरा पाहिल्यावर पार्मेनियनच्या काळजाचा ठोका चुकला. तो जवळजवळ ओरडलाच, “ निसियस !”
                        अलेक्झांडरने चमकून पार्मेनियनकडे पाहिले. “होय !..निसियस.....तुमचा मुलगाच पार्मेनियन!” ...आधीचा खिन्नपणा जाऊन अलेक्झांडरचा चेहरा कठोर झाला होता. डोळ्यांत संताप दाटून आला होता. एखाद्या संतप्तं सर्पाप्रमाणे तो फुत्कारला,”तुझं काय म्हणणं आहे निसियस ?”
                        आपले प्रारब्ध निसियसला माहीत झाले असावे. त्याची त्याला पर्वा नसावी. जराही न डगमगता करारीपणे त्याने उत्तर दिले, “तू सत्तापिपासू सैतान आहेस अलेक्झांडर ! अर्धे जग जिंकल्यावरही तुझं समाधान झालेलं नाही. तुला ते स्वत:साठी संपूर्ण हवय !”
                        निसियसने एक तिरस्कारपूर्ण कटाक्ष अलेक्झांडरवर टाकाला.
                        अलेक्झांडरच्या डोळ्यांत क्रौर्य दाटून आले. धारदार  शब्दांत तो निसियसला म्हणाला, “ जो माझ्या मार्गात आडवा येईल त्याला कापून काढून हे अर्धं जग मी अंकित करुन घेतलय. उरलेलं अर्धं जग जिंकायचं तर तुलाही कापून काढायला मी मागेपुढे पाहणार नाही.”
                        “मी मरणाला भीत नाही,” निसियसने बाणेदारपणे उत्तर दिले.
                        “निसियसच्या ह्या उत्तरावर अलेक्झांडर हसला. त्याच्या हसण्यात उपहास ठासून भरला होता. “मरणाला तर मीही भीत नाही. पण मला आत्ता मरायचं नाही.” अलेक्झांडरच्या शब्दांत ठामपणा होता.
                        “मग त्यालाही आत्ता मारू नका,” पार्मेनियनने आर्जव केलं.
                        अलेक्झांडरला आश्चर्य वाटलं. स्वामीद्रोह्यांना देहदंडच दिला  गेला पाहिजे , ह्या आपल्या मताशी थोड्या वेळापूर्वी पार्मेनियननेच सहमती दर्शविल्याची आठवण अलेक्झांडरने त्याला करुन दिली.
                        पार्मेनियनने मान खाली घातली. अलेक्झांडरचा कृत् निश्चयी स्वभाव त्याला माहीत होता. तो आपल्या निर्णयापासून तसूभरही ढळणार नाही ह्याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.
                        तेव्हढ्यात शिपायांनी जेरबंद केलेल्या निसियसला शामियान्याबाहेर न्यायला सुरूवात केली. ते पाहून पार्मेनियनही पाठोपाठ जाऊ लागला. पण अलेक्झांडरच्या अंगरक्षकांनी त्याला पकडले. त्याची शस्त्रं काढून घेतली. अलेक्झांडर त्याला सामोरा आला. मघाचे त्याच्या चेहर्‍यावरचे क्रौर्य पुसले गेले होते. हळवेपणा त्याच्या चेहर्‍यावर आला होता. कातर स्वरात त्याने पार्मेनियनला म्हटले.,”मी मुलाला ठार मारलं तर त्याचा पिता सूड उगवेलच,नाही का ?”
                        पार्मेनियनने होकारार्थी मान हलविली.
                        अलेक्झांडरमधला कर्तव्यकठोर राज्यकर्ता पुन्हा जागा झाला. पार्मेनियनच्या डोळ्याला डोळा भिडवून तो म्हणाला, “म्हणजे मला आणखी एक शत्रू तयार झाला. तुम्ही माझ्याविरूद्धं ह्यावेळी कट्कारस्थान केले नसले तरी तुम्हाला मला आत्ताच संपवावे लागणार. समजले ना ?”
                        पार्मेनियनने सेनापतीला साजेसा निग्रही होकार भरला.
                        आपल्या ह्या विश्वासू,प्रामाणिक आणि शूर सेनापतीला मृत्यूच्या दारात लोटावे लागणार ह्याचे मनस्वी दु:ख होऊन अलेक्झांडरचे डोळे पाणावले. तो त्याला म्हणाला, “ पार्मेनियन, निसियस माझ्याबद्दल जे म्हणाला ते चुकीचं आहे. राज्यं करायचं तर केवळ क्रूर होऊन भागत नाही. तुम्हाला कुणावरही विश्वास ठेवता येत नाही. अगदी आपले मित्रं म्हणून सभोवती वावरतात त्यांच्यावरही नाही. सर्वांकडे लक्षं द्यावे लागते,त्यांच्या चाली समजून घ्याव्या लागतात, त्यांना अडकविण्यासाठी सापळे लावावे लागतात. कटकर्त्यांची कटकारस्थानं समजून घेण्यासाठी हेरगिरीचं माध्यम वापरावं लागतं. मी ते वापरलं.”
                        अलेक्झांडरला जास्तं काही बोलता आलं नाही. त्याने पार्मेनियनची शेवटची गळाभेट घेतली.
                        पार्मेनियनला शामियान्याबाहेर नेण्यात आले.

                                                                                          
                                                                                           ©   :- पंकज कालुवाला


No comments