स्वप्नं पाहणं चांगलं असतं.....

स्वप्नं पाहणं चांगलं असतं. 
मोठी स्वप्नं पाहणं त्याहूनही चांगलंच असतं. 
पण स्वप्नं पाहतानाही वास्तवाचं,आपल्या क्षमतांचं, त्या वाढवत न्यायचं, त्यासाठी अपरंपार कष्ट उपसण्याचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व करत असताना आपली सद्सद्विवेकबुद्धी न हरवू देण्याचं भानही कायम ठेवावं लागतं. 
तसं स्वप्नं छोटी असो वा मोठी; थोडी स्वार्थी असतातच. ते नाकरण्यात काही अर्थही नाही. पण स्वप्नांना वास्तवाचं मूर्त स्वरूप देताना, त्यातील स्वार्थाला मर्यादा घालून समाजहिताची झालर लाऊन ती आणखी व्यापक करण्यातच कोणाचंही मोठेपण असतं. अशी समाजहिताची व्यापक झालर ल्यालेली स्वप्नं इतर अनेकांना स्वप्नं पाहायला,ध्येयवादी व्हायला कळत-नकळत प्रवृत्तं करत असतात.
स्वार्थाने बरबटलेली आणि आत्मकेंद्री स्वप्नं वास्तवात येताना व्यक्तिगत आनंद देतातही, परंतु त्याबरोबर इतरांमध्ये असुया,द्वेष,तिरस्कारही निर्माण करतात.
स्वार्थी-संकुचित स्वप्नं पाहायची की व्यापक, हे ज्याच्या त्याच्या वृत्ती-प्रवृत्तीवर आणि सद्सद्विवेकबुद्धीवर अवलंबून !
स्वप्नांना सद्सद्विवेकबुद्धीचं कोंदण लाभलं की,ते स्वत:बरोबरच इतरांनाही आनंद देतंच देतं.

No comments