शेवटी मोठी माणसं ही मोठीच असतात....

हे आहे मी मार्च 2002 मध्ये प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ.वसंतराव गोवारीकर सरांना त्यांच्या "कथा इस्त्रोची" या पुस्तकाच्या अभिप्रायपर पत्राला आलेलं त्यांचंच त्यांच्याच हस्ताक्षरातलं सविस्तर पत्रोत्तर! 

शेवटी मोठी माणसं ही मोठीच असतात. डॉ.गोवारीकरांबद्दल कुणाला काही सांगायला हवं असं नाही. अग्नीबाणांच्या इंधनासंबंधीचं आणि स्वदेशातच त्याचं अगदी कमी खर्चात उत्पादन करण्यासंबंधीचं संशोधन जगन्मान्यं आहे. गोवारीकर सर आधी इंग्लंडमध्ये संशोधंकार्यात व्यग्र होते. त्यांचं तेथलं काम सुरू असतानाच येथे भारतात अंतराळसंशोधनासाठी संस्था स्थापन करायचा निर्णय झाल्यानंतर डो.विक्रम साराभाई आणि त्यावेळच्या आपल्या पंतप्रधान मा.इंदिराबाईंनी विशेष विनंती केल्यानंतर गोवारीकर सरांनी परदेशातील आपली नोकरी सोडून भारतात परतायचा निर्णय घेतला. त्यावेळी इस्त्रो फक्तं कागदावरच होती. प्रयोगशाळा, तंत्रशाळा, साहित्यसाधनं, मनुष्यबळ, इमारती आणि इतर सोईसुविधा यांची वानवाच होती. तसं असलं तरी गोवारीकर सरांसह इतर अनेक वैज्ञानिकांनी त्याचा बाऊ न करता केवळ देशप्रेमाखातर आपल्या कामाला सुरूवात केली आणि नंतर इस्रोने अंतराळविज्ञानाच्या क्षेत्रात कोणता इतिहास घडवला तो जगाने पाहिला.
.
थोडक्यात या देशात गेल्या साठ वर्षात काही झालेलंच नाही,हे धादांत खोटं आहे. सरकार कॉग्रेसचं असू द्या अथवा इतर कोणत्याही पक्षाचं, या देशाच्या प्रगतीसाठी अनेक लोकांनी त्याग केला आहे, आपलं आयुष्यं पणाला लावलं आहे,बलिदान दिलेलं आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने देशात आधी काहीच झालं नसल्याचा दावा केला तरी आमच्यासारख्यांना तो दावा करता येत नाही. करणंही योग्यं नाही. तसा केला तर तो आमच्या पवित्र पेशाशी केलेला मोठा द्रोह ठरेल. देशासाठी,समाजासाठी झटणार्‍या कोणाचंही त्याच्या राजकीय विचारधारा,धार्मिक विचारधारा, धर्म,जात,पंथ,प्रांत,भाषा यांचा विचार न करता वस्तुनिष्ठ व प्रामाणिकपणे नोंद घेणं हे आमच्या पेशाचं पहिलं कर्तव्यं आहे, असं मी समजतो. यासंदर्भात मी मागे कधीतरी हिंदीत वाचलेलं " किसी की किर्ती चुराना जघन्यं अपराध है," हे वाक्यं कायम मनात घर करून राहिलं आहे. ही अशी जुनी पत्रं पाहिली की,या कर्तव्यभावनेला पुन्हा पुन्हा खतपाणी मिळत राहतं. म्हणून अधुनमधून मी ही पत्र वाचतो.....





No comments