स्पर्धा युगात टिकायचे असेल तर इंग्रजी शिवाय पर्याय नाही ????.....

स्पर्धा युगात टिकायचे असेल तर इंग्रजी शिवाय पर्याय नाही......... 
.
यासारखा भंपकपणा आणि तद्दन खोटारडेपणा त्याचबरोबर पुरेपूर न्यूनगंड दूसरा नाही. स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजीची आवश्यकता नसते. स्पर्धेत टिकायचं असेल तर तुमचं काम तुम्हाला व्यवस्थित यायला पाहिजे,कसब आत्मसात असलं पाहिजे,मेहनती वृत्ती असली पाहिजे, जिद्द असली पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्यातला विद्यार्थी-तुमची ज्ञानलालसा कायम असली पाहिजे. तुम्ही फाडफाड इंग्रजी बोलता-लिहिता, पण आपल्या कामात "ढ" आणि आळस अंगात पुरेपूर भिनलेला....मग व्हायचं कस?....
.
याचा अर्थ इंग्रजी शिकूच नये असा मुळीच नाही. भाषा म्हणून इंग्रजी शिकावी. इंग्रजीच कशाला, पण जगातली कोणतीही भाषा; ही भाषा म्हणून शिकावी. त्याचा जीवनात फायदाच होतो. त्या त्या भाषेतलं ज्ञानाचं संचित ती ती भाषा शिकल्यामुळे आपोआपच आपल्याला खुलं होतं. अर्थात ज्ञानार्जन ही प्रयत्नसाध्यं गोष्टं आहे,हेही कायम लक्षात ठेवावं लागतं. थोडक्यात एखादी भाषा आपल्याला येत नाही म्हणून आपलं आयुष्य़ं फुकट गेलं, असं समजायचं आणि एखादी भाषा आपल्याला येते म्हणून आपण फार मोठा तीर मारलाय, असं समजायचंही काही कारण नसतं. गरज निर्माण झाली की,आपोआपच कोणतीही भाषा कधीही शिकता येते.


No comments