कोणतेही हल्ले "भ्याड" कसे ?

कोणत्याही प्रकारचा कोणताही "हल्ला" हा कधीही भ्याड नसतो. मूळात हिंमत आणि हुशारी त्याचबरोबर नियोजन आणि साधनसामग्री जवळ असल्याशिवाय हल्ला किंवा आक्रमण करता येत नाही. म्हणूनच कोणत्याही हल्याचा बारकाईने अभ्यास करून त्यातले बारकावे शोधायचे असतात आणि त्यावर आवश्यक ती उपाययोजनाही करायची असते. हे काम गुप्तचर संस्था,सुरक्षा यंत्रणा आणि राजकीय नेतेमंडळींचच असतं,असं समजायचं काही कारण नाही. सर्वसामान्यं माणसं आणि जनतेनेही ते यथाशक्ती करायचं असतंच असतं. पण दुर्दैवाने येथले नेते,माध्यमं आणि तथाकथित विचारजंत कोणत्याही हल्ल्याची "भ्याड हल्ला " म्हणून समजूत करून देऊन स्वत:ला सुरक्षित समजतात आणि त्याचबरोबर समाजाचीही दिशाभूल करत असतात. दहशतवादी आणि गुन्हेगारी मनोवृत्तीच्या लोकांचं,संघटनांचं फावतं ते अशा मनोवृत्तीमुळेच ! अशा हल्यांनंतर अनावश्यक राजकीय वक्तव्यं करून आगीत तेल ओतू पाहणारी सर्वपक्षीय राजकारण्यांची "डुक्कर मनोवृत्ती" हाही यातला एक गंभीर भाग !
.
दहशतवादी हल्यांची दाहकता कमी करायची असेल, तर समजातल्या सर्वच थरांतून दहशतवाद,दहशतवादी मानसिकता,त्यांची कार्यपद्धती आणि प्रतिबंधक उपाययोजना याविंषयी मोठ्या प्रमाणात जागृती करावी लागेल. त्यासाठी पब्लिक-गव्हर्नमेंट आणि पब्लिक-पोलीस पार्टनरशीप असणं आणि त्यात परस्परसमन्वय, परस्परविश्वास असणंही आवश्यक ठरेल. ते नेमकं कसं साधायचं हा कळीचा मुद्दा असला,तरी ते साध्यं केलं जाऊ शकत नाही,असंही नाही.
.
राहता राहिला मुद्दा दहशतवादाचा पूर्णत: बिमोड करण्याचा, दहशतवाद पूर्णत: संपवण्याचा ! तर ते कधीही साध्यं होण्यासारखं नाही. कारण तुम्ही जगात कोठेही गेलात तरी परिपूर्ण अशी व्यवस्था कोठेही अस्तित्वात नाही. व्यवस्थेत त्रुटी या असतातच. व्यवस्था जशी काम करत जाते तसतसे तिच्यात दोष हे निर्माण होत जातातच आणि नंतर त्याला शह द्यायचा प्रयत्न हा होतोच. त्याशिवाय व्यवस्था चांगली असो वा वाईट तिला शह देऊ पाहणार्‍या,ती उलथवू पाहणार्‍या मानसिकतेचा एक छोटा का होईना वर्ग सर्वत्र अस्तित्वात असतोच. त्यामुळेच दहशतवाद असो वा गुन्हेगारी एका स्वरूपात संपल्यासारखे वाटले तरी दुसर्‍या स्वरूपात डोकं वर काढताना आपल्याला दिसतात. त्यामुळेच सातत्याने त्यांच्याविरूद्ध लढावं लागतं. तेव्हा सरकार,सुरक्षा यंत्रणा आणि सामान्यं माणसालाही ही " सातत्याने लढत राहण्याची मानसिकता" अंगी बाणवावी लागेल.

No comments