विज्ञानव्रती पक्षीमित्र दिगंबर ग़ाडगीळ सर

विज्ञानव्रती पक्षीमित्र दिगंबर ग़ाडगीळ सर


हल्ली धार्मिक,जातीय,आर्थिक कारणांवरून एकमेकांना पाण्यात पाहणं,कमी लेखणं,हेटाळणी करणं आणि त्यातच गुंतून राहण्याचे प्रकार नित्याचेच झालेत. सुदैवाने आपण त्यापासून काहीसे अलिप्त आहोत,त्यापासून अलिप्त राहणार्‍या आणि समाजाप्रतिच्या आपल्या कर्तव्याला झुकतं माप देणार्‍या माणसांच्या नित्यं सहवासात आणि छत्रछायेखाली असतो; ही भावना फारच सुखावणारी असते.अशा माणसांची यादी करायची झाली, तर फार मोठी होईल. कधीतरी त्यांच्याविषयी बोलता-लिहिता येईलच. आता मी आमच्या श्री.दिगंबर गाडगीळ(Digambar Gadgil) सरांविषयी थोडंसं बोलतो. 

माझ्या आयुष्यातील फार मोठा नसला तरी 12 पुस्तकांचा एक टप्पा पार पाडल्यानंतर आमच्य श्री.गाडग़ीळ सरांविषयी बोलणं माझ्यासाठी आवश्यकच आहे. आवश्यक अशासाठी की,झाड कितीही उंचच उंच वाढायचा प्रयत्न करत असलं तरी त्याला आपली मूळं कुठे आहेत हे विसरता येत नाही; पक्ष्याने आकाशात कितीही उंच भरारी घ्यायचा प्रयत्न केला तरी जमिनीशी असलेलं आपलं नातं त्याला विसरता येत नाही. तसा विसर पडला तर दोघेही मरतील हे एक कारण आणि दुसरं कारण आपण कोणाच्या खांद्यावर उभे आहोत याचं भान सतत असलं तर आपल्या उंचीचा माज येत नाही. हे भान ज्यांच्याकडे पाहून सतत येतं त्यांच्यापैकी एक म्हणजे आमचे श्री.दिगंबर गाडगीळ सर. तसं बहुसंख्यं नाशिककरांना त्यांचा चांगला परिचय आहे तो विज्ञानलेखक आणि त्याहीपेक्षा जास्तं पक्षीमित्र गाडगीळ म्हणून. आजच्या घडीला सरांचं वय 80 हून अधिक आहे. परंतु गेली 60 हून अधिक वर्षे चाललेलं त्यांचं विज्ञानलेखन,पक्षीनिरीक्षण आणि निरनिराळं सामाजिक चळवळीचं काम आजही तितक्याच जोमात सुरू आहे,हे येथे ठळकपणे नोंदवावं लागतं. जराशा परिश्रमाने थकणार्याच-भागणार्याु आमच्यासारख्यांना सरांकडे पाहिलं की वेगळीच उर्जा मिळते. 
.
सरांशी माझा संबंध यायचं कारण अर्थातच विज्ञानप्रेम आणि विज्ञानलेखन करण्याची जबरदस्त उर्मी. गाडगीळ सरांनी ग्रामीण भागांतून व्यापक प्रमाणावर विज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून जिल्हा वर्तमानपत्रांना विज्ञानलेख पुरविणारी सायन्स फीचर्स,नाशिक नावाची संस्था श्री.रमेश महाले,प्रा.चंद्रकांत सहस्त्रबुद्धे,वैद्य विक्रांत जाधव,चित्रकार पंडित सोनवणी,प्रा.गिरीश पिंपळे आणि इतर अशा आपल्या समविचारी सहकार्यांाना सोबत घेऊन स्थापन केली होती. सातत्याने 17-18 वर्षे हे काम अव्याहत चालविल्यानंतर गेल्याच वर्षी 2017 मध्ये काही अडचणींमुळे या संस्थेचं काम थांबलं तेव्हा अर्थातच बरीच हळहळ वाटली. स्वत: गाडगीळ सर आणि सायन्स फिचर्सने आपल्या कामाचा कधीही गाजावाजा केला नसला तरी संस्थेचा व्याप बराच मोठा होता. दै.गांवकरी(नाशिक), गोदातीर समाचार(नांदेड), दै.संचार(लातूर), दै.प्रभात(पुणे),तरूण भारत(बेळगांव), दै.पुढारी(कोल्हापूर) व त्याशिवाय ग्रामीण भागांतून प्रकाशित-प्रसारित होणार्या नियतकालिकांना विज्ञानलेख पुरविण्याचं काम सायन्स फीचर्सने गाडगीळ सरांच्या मार्गदर्शनाखाली केलं.फीचर्सच्या कामावर गाडग़ीळ सरांचं बारीक लक्ष असायचं.वर्तमानपत्रांचे मुख्यं संपादक आणि विज्ञान विभाग सांभाळणारे उपसंपादक यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे लेख छापून न येणं अथवा मानधनाच्या समस्या कधीच आल्या नाहीत.मीही 2005 ते 2012 या सात वर्षांच्य काळात फीचर्ससाठी विज्ञानलेखन केलं.आताच्या लेखनात जी काही सफाई दिसते त्यामागे आमच्या गाडगीळ सरांचा आणि सायन्स फीचर्सचा मोठा हात आहे,हे मान्यं करणं आणि त्याप्रति कृतज्ञता व्यक्तं करणं मी माझं कर्तव्यच समजतो. 

. सरांची आतापर्यंत बरीच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. वर्तमानपत्रांतून त्यानी किती लिखाण केलं याची गणतीच नाही. मराठी विज्ञान परिषदेच्या नाशिक विभागाच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांना मिळालेली पक्षीमित्र गाडगीळ ही उपाधी त्यांचा पक्षीनिरीक्षण व अभ्यासातला व्यासंग दर्शवायला पुरेशी आहे.अशा या आमच्या गाडगीळ सरांना दीर्घयुष्यं मिळो आणि त्यांचं मार्गदर्शनही आम्हाला दीर्घक़ाळ मिळो हीच सदीच्छा ! 
.......................................................................................
छायाचित्र :- श्री. Anand Bora यांच्या फेसबुक वॉलवरून साभार . 
https://www.facebook.com/anand.bora.75

No comments