इस्रायली गुप्तचर विश्वाचा वेध (पुस्तक परिक्षण ) --विशाखा कुलकर्णी

इस्रायली गुप्तचर विश्वाचा वेध

आजच्या पिढीचे लेखक पंकज कालुवाला यांच्या गुप्तचर संघटनांविषयीच्या विविध पुस्तकांपैकी हे एक.

(संग्रहित छायाचित्र)

विशाखा कुलकर्णी
गुप्तचर यंत्रणा म्हणजे तरुणाईचा आवडीचा विषय. देशप्रेम, थरार, चातुर्य, राजकारण अशा सगळ्या गोष्टींनी एखाद्या गुप्तचर यंत्रणेचे काम समजून घेणे अतिशय रंजक असते. ‘इस्रायलची मोसाद’ हे ‘मोसाद’ या इस्रायलच्या गुप्तचर संघटनेची सखोल माहिती देणारे पुस्तक. आजच्या पिढीचे लेखक पंकज कालुवाला यांच्या गुप्तचर संघटनांविषयीच्या विविध पुस्तकांपैकी हे एक.
इस्रायल हा एक लहानसा पण तरीही जगाच्या नकाशावर आपले नाव ठळक असणारा देश, हा देश म्हटलं की जगाला आठवतो तो म्हणजे ज्यू अर्थात यहुदी समाज. हिटलरच्या वंशसंहारातून वाचलेल्या अगदी मूठभर यहुदी लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या देशाने अल्पावधीत प्रचंड प्रगती केली. आजूबाजूच्या बलाढय़ अरब राष्ट्रांना हा देश पुरून उरला. आणि हे अत्यंत कमी मनुष्यबळ असूनही केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर. इस्रायलची ही बुद्धिमत्ता एकवटूनच मोसाद या संघटनेची बांधणी झाली आणि या संघटनेचा आत्तापर्यंतचा प्रवास आपल्याला या पुस्तकात वाचता येतो.
या पुस्तकाची सुरुवात होते ती यहुदी लोकांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून आणि हाच या पुस्तकाला वाचकाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरतो. एखाद्या देशातील आजच्या युद्धस्थितीविषयी जाणून घेताना केवळ चालू घडामोडींचा अभ्यास करून चालत नाही, तर या घटनांची बीजे कुठे रोवली गेली हेही बघणे महत्त्वाचे असते. देशातील नागरिकांचा एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्या घटनेला एक वेगळा आयाम देतो. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात यहुदी समाज कसा निर्माण झाला, कुठून आला इथपासून माहिती आहे. शिवाय ही माहिती कुठेही उगाच न लांबवता थोडक्यात पण महत्त्वाची तेवढीच सांगितली आहे, बहुतांश वेळा सामान्य वाचकाला यहुदी समाज केवळ हिटलरच्या वंशसंहारासंदर्भातच माहिती असतो, त्याविषयी अनेक पुस्तके वाचली जातात, मात्र यहुदी आणि इतर अरब राष्ट्रांमध्ये असणारे वैर का आहे, इस्रायल हा स्वतंत्र देश तयार होणेसुद्धा किती अवघड होते या सगळ्याचा अंदाज आपल्याला पहिल्या दोन प्रकरणांमध्ये येतो. आणि त्यामुळेच यानंतरच्या प्रकरणांची तीव्रता, गांभीर्य आपल्याला लक्षात येते.
मोसादचे पूर्वस्वरूप, त्याचा उद्देश अशा गोष्टींची ओळख करून देत मोसादच्या एकेका ‘ऑपरेशन’च्या गोष्टी तपशीलवार या पुस्तकात येतात. या गोष्टी केवळ एखादी गोष्ट सांगायचीय अशा आविर्भावात न लिहिता अगदी योग्य आणि सखोल बारकाव्यांसह लिहिल्या आहेत. पण त्यामुळे यात कुठेही गोष्टीची रंजकता, त्यात असलेला थरार लेखकाने कमी होऊ  दिलेला नाही. संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल इतक्या विस्तृत स्वरूपाची माहिती देताना गोष्टीतील उत्कंठा तशीच ठेवण्याचे कौशल्य लेखकाने आपल्या संतुलित लेखनशैलीतून अगदी अचूक साधले आहे.
पुस्तकाचे पहिले प्रकरण म्हणजे ‘ऑपरेशन थीफ’, कमीतकमी मनुष्यबळ व साधनसामुग्रीमध्ये यशस्वी झालेली ही मोहीम इस्रायलच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरली होती. पुढील प्रकरणांमध्येदेखील अनेक मोहिमांचे अगदी थरारक वर्णन, त्या मोहिमांची आखणी करताना केलेला विचार आणि त्या वेळी घेतली जाणारी काळजी यातून एखाद्या मोठय़ा मोहिमेची आखणी करताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात हा अभ्यास अगदी थक्क करणारा आहे. देशासाठी वेळ आल्यावर अक्षरश: काहीही करण्याची तयारी असलेले मोसादचे शिलेदार आपल्या देशभक्तीची परिसीमा गाठताना दिसतात. एखादी मोहीम ठरवताना केवळ त्या मोहिमेचे यश- अपयश यावर अवलंबून असणाऱ्या राजकारणातील अनेक बाबी या गोष्टी वाचून लक्षात येतात. पुस्तकात मोहिमांविषयी लिहितानाच केवळ मोहिमेशी निगडित घटना न लिहिता त्यासंबंधित आणि त्याच वेळी घडणाऱ्या राजकीय घटना, मोसादमधील इतर हालचाली याबद्दलचीही माहिती दिल्यामुळे मोसाद व इस्रायलचा प्रवास वाचकाला नीट लक्षात येतो. अतिशय मोठय़ा कालखंडातील घटना पुस्तकात सखोल मांडल्या असूनदेखील वाचताना कुठेही या घटना असंबद्ध वाटत नाहीत.
मराठी पुस्तके वाचण्याची आवड असणाऱ्या वाचकांनी अनेकदा वंशसंहारातून वाचलेल्या, न वाचलेल्या अनेक लोकांचे अनुभव, त्याविषयीची पुस्तके वाचलेली असतात. त्यामुळे मोसादविषयी वाचताना उत्सुकता असते ती या वंशसंहाराचा ‘बदला’ इस्रायलने घेतला का? आणि घेतला तर तो कसा? या प्रश्नांची उत्तरे ‘इस्रायलची मोसाद’ या पुस्तकात मिळतातच, पण हे वाचून ज्यूंवर झालेल्या अत्याचाराने व्यथित झालेल्या मनाला एक प्रकारचे समाधानदेखील मिळते. अ‍ॅडॉल्फ आईकमान, हर्बर्टस ककुर्स यांसारखे वंशसंहाराच्या क्रूर कृत्यात महत्त्वाचा हात असलेले नाझी अधिकारी, जे हिटलरच्या मृत्यूनंतर आपली ओळख बदलून जगाच्या कुठल्याशा कोपऱ्यात सुखाने नांदत होते अशा अधिकाऱ्यांना प्रचंड शिताफीने त्यांच्याच घरात घुसून पकडण्याच्या मोसादच्या मोहिमा प्रचंड थरारक आणि क्षणोक्षणी वाढत जाणारी उत्कंठा यामुळे वाचकाला एक वेगळाच अनुभव देतात.
या पुस्तकाचे एक वैशिष्टय़ असे की पुस्तकाच्या नावातच मोसाद असल्याने केवळ मोसादचा उदो उदो कुठेही करण्यात आलेला नाही, त्रयस्थपणे घडलेल्या घटनांचे कथन करताना यशस्वी झालेल्या मोहिमांबरोबर ज्या मोहिमा अयशस्वी झाल्या, ज्यात चुका झाल्या, अडथळे आले त्या मोहिमांविषयीदेखील यात तितक्याच विस्ताराने सांगितले आहे.
पुस्तकात निव्वळ घटनांवर भर न देता त्यात सहभागी असलेल्या व्यक्तिरेखाही लेखकाने उभ्या केल्या आहेत, वाचकाला त्या व्यक्तिरेखांची ओळख करून दिल्याने त्या कथेत वाचक अधिकच गुंतत जातो. प्रथमदर्शनी पुस्तकाचा मोठा आकार बघून यात काहीतरी जड लिखाण असेल असा होणारा गैरसमज पुस्तक वाचत असताना हळूहळू दूर होतो. आणि अगदी विस्ताराने लिहिलेले पुस्तक वाचून झाल्यावरसुद्धा अधिक वाचत राहावेसे वाटते. एकूणच काय, ‘‘मराठीमध्ये दर्जेदार साहित्य लिहिले जात नाही, अनुवादित लिखाण केव्हाही मराठीपेक्षा सरस असते,’’ असा सूर असणाऱ्या वाचकांसाठी ‘इस्रायलची मोसाद’ हे पुस्तक प्रत्युत्तर आहे. थरारक आणि गुंतवून टाकणारे असे हे पुस्तक आवर्जून वाचावे असेच आहे.
: --- विशाखा कुलकर्णी 


No comments